रत्नागिरी/प्रतिनिधी: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रक...
रत्नागिरी/प्रतिनिधी: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. त्यावरुन आता जोरदार राजकारण रंगले आहे. सुरक्ष्या व्यवस्थेत कपात करण्यात आल्यानंतर माझ्या जिवाचे काही बरे वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी दिली.
राज्य सरकारने माझी सुरक्षा कालच काढली. मला केंद्र सरकारची सुरक्षा आहे. अतिरेक्यांपासून माझ्या जिवाला धोका असल्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली होती; पण राज्य सरकारने माझ्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. त्यामुळे जर माझ्या जिवाला धोका निर्माण झाला, तर त्याला राज सरकार जबाबदार असेल, असे राणे म्हणाले.फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा देण्यात आली होती. ही सुरक्षा काढून त्यांना एक्स सुरक्षा देण्यात आली आहे. दिविजा फडणवीस यांचीही वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा काढून एक्स सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच दीपक केसरकर यांची वायप्लस सुरक्षा काढून वाय, आशिष शेलार आणि राम नाईक यांची वायप्लस सुरक्षा काढून त्यांना वाय सुरक्षा देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा होती. त्यात कपात करून आता त्यांना वायप्लस सुरक्षा देण्यात आली आहे. अंबरीशराव अत्राम, चंद्रकांत पाटील. संजय बनसोडे, सुधीर मुनगंटीवार, नारायण राणे, रावसाहेब दानवे, राजकुमार बडोले, हरिभाऊ बागडे, राम कदम, प्रसाद लाड, मोरोतराव कोवासे, शोभाताई फडणवीस, कृपाशंकर सिंह आणि माधव भंडारी आदी नेत्यांना देण्यात आलेली वायप्लस एस्कॉर्टसह, वायप्लस, वाय आणि एक्स दर्जाची सुरक्षा रद्द करण्यात आली आहे.
बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आल्यामुळे भाजपतून टीका सुरू झाल्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला. सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच आहे आणि त्यांची सुरक्षा काढली नाही तर कमी केल्याचे सत्तार म्हणाले.