मुंबई / प्रतिनिधी : मुंबईत पोलिस उपअधीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 31 वर्षीय महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाने...
मुंबई / प्रतिनिधी : मुंबईत पोलिस उपअधीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 31 वर्षीय महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकानेच याबाबत फिर्याद दिली. लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. आरोपीची ज्युनिअर अधिकारी म्हणून तक्रारदार महिला कार्यरत होती.
मुंबईत सहाय्यक पोलिस आयुक्तपदावर कार्यरत असताना आरोपीने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा महिलेने केला आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2019 या काळात हा प्रकार घडल्याचा आरोप या महिलेने केला आहे. आरोपीने आपण विवाहित असल्याची माहिती आपल्यापासून लपवली होती. आपण अविवाहित असल्याचे सांगून त्याने लग्नाचे आमिष दाखवले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा दावा महिलेने केला आहे. लग्नाच्या भूलथापांना फसून त्या वेळी विवाहित असलेल्या तक्रारदार महिलेने पतीपासून घटस्फोट घेतला. आरोपीने अचानक टाळाटाळ करण्यास सुरुवात केल्याने तक्रारदार महिलेने अधिक चौकशी केली, तेव्हा त्याची बनवाबनवी उघडकीस आली. आरोपी पोलिस उपअधीक्षकाला अद्याप अटक झालेली नाही. त्याची विभागांतर्गत चौकशीही सुरू करण्यात आलेली नाही.