राहुरी प्रतिनिधी : राहुरी शहरात काही महिन्यांपासून भूरट्या चोरांचा सुळसूळाट झाला. मोबाईल चोरी व मोटरसायकल चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वा...
राहुरी प्रतिनिधी : राहुरी शहरात काही महिन्यांपासून भूरट्या चोरांचा सुळसूळाट झाला. मोबाईल चोरी व मोटरसायकल चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. राहुरीचे पोलिस प्रशासन चोरीच्या घटनांवर आळा घालण्यात असमर्थ ठरत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीपेठेतून दिवसा मोटारसायकल चोरून चोरट्यांनी पोलिसांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात.
राहुरी शहरातील नवीपेठेत असलेले धामने मेडिकलचे मालक विश्वजीत राधाकृष्ण धामने वय 29 वर्ष, राहणार राहुरी बुद्रुक. यांनी 1 जानेवारी 2021 रोजी दुपारी त्यांच्या मेडीकल समोर त्यांची होंडा कंपनीची काळ्या रंगाची युनिकॉन मोटारसायकल लावली होती. यावेळी अज्ञात भामट्याने दिवसा ढवळ्या मेडीकल समोर लावलेली मोटारसायकल चोरून पोबारा केला. काही वेळाने मोटारसायकल चोरी गेल्याचे लक्षात येताच विश्वजीत धामने यांनी परिसरात मोटारसायकलचा शोध घेतला. मात्र मोटारसायकल मिळाली नाही. विश्वजीत राधाकृष्ण धामने यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस स्टेशनमध्ये आयपीसी 379 प्रमाणे अज्ञात चोराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सोमनाथ जायभाये हे करीत आहेत. राहुरी शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून भूरट्या चोरांनी उच्छाद मांडला आहे. छोट्या मोठ्या चोर्या, घरफोड्या, मोबाईल व मोटरसायकल चोरी आदिंचे प्रमाण वाढले आहे. या घटनांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलिस प्रशासनाचा दबदबा राहीला नसल्याचे दिसून येत आहे. शहर व परिसरात वाढत्या चोर्यांना आळा घालण्यात पोलिस प्रशासन असमर्थ ठरत आहेत. भूरट्या चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.