नवी दिल्ली: 2016 मध्ये एम्सच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे (आप) आमदार सोमनाथ भारती यांना राउज एव्हेन्यू कोर्टाने ...
नवी दिल्ली: 2016 मध्ये एम्सच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे (आप) आमदार सोमनाथ भारती यांना राउज एव्हेन्यू कोर्टाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने भारती यांना शनिवारी दुपारी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.
सोमनाथ भारती यांच्यावर इजा पोहोचवणे, सरकारी कर्मचारीच्या कामात अडथळा निर्माण केल्याचे आरोप सिद्ध झाले आहेत. त्यांना या प्रकरणी दोषी ठरवले आहे. तसेच भारती यांना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणीही दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तत्पूर्वी, या प्रकरणात भारती यांना शिक्षा सुनावली असली, तरी न्यायालयाने अन्य चार आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सोमनाथ भारती यांना अलीकडेच उत्तर प्रदेश पोलिसांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल टिप्पणी केल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. त्यांना अनेक दिवस कोठडीत काढावे लागले; मात्र त्यानंतर भारती यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. भारती यांच्याविरोधात अमेठी आणि रायबरेलीत दोन गुन्हे दाखल झाले होते. त्यातील एका प्रकरणात न्यायालयात सुनावणी झाली.