आ. लंके यांनी घेतली भेट; संरक्षणमंत्र्यांना निवेदन देणार अहमदनगर/प्रतिनिधी: नगरची खास ओळख असलेली वाहन संशोधन व विकास संस्था (व्हीआरडीई) चे...
आ. लंके यांनी घेतली भेट; संरक्षणमंत्र्यांना निवेदन देणार
अहमदनगर/प्रतिनिधी: नगरची खास ओळख असलेली वाहन संशोधन व विकास संस्था (व्हीआरडीई) चेन्नईला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ही संस्था येथून हलविण्यात येऊ नये, यासाठी आमदार नीलेश लंके यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन व्हीआरडीई न हलविण्याचे साकडे घातले. पवार संरक्षणमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यांशी याबाबत बोलणार आहेत.
या निर्णयाची अंमलबजावणी झाली, तर एक मोठी केंद्रीय संस्था राज्याबाहेर जाण्याच्या धोका आहे. व्हीआरडीई ही संस्था नगर-दौंड रस्त्यावर आहे. केंद्रीय संरक्षण विभागाच्या देशभरात 52 शाखा आहेत. त्यातील नगरची एक शाखा आहे. नगरच्या शाखेतील प्रयोगशाळेने आतापर्यंत अनेक उपयुक्त संशोधने केली आहेत. संरक्षण विभागासाठी आवश्यक असलेली वाहने आणि अन्य सामुग्री येथे विकसित झाली आहे. याशिवाय वाहनांची तपासणी करून त्यांना प्रमाणित करणारा विशेष ट्रॅकही या संस्थेत आहे. आता मात्र ही संस्था बंद करून ती चेन्नई किंवा अन्य ठिकाणच्या शाखेत वर्ग करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिकांमधून या स्थलांतराला विरोध सुरू झाला आहे. आ. लंके यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधीचे सविस्तर एक निवेदन दिले. दिल्लीत संरक्षण विभागात प्रयत्न करून ही संस्था नगरमधून जाणार नाही, याची काळजी घ्यावी, नगरमधील एक हजार कुटुंंबीयाचे यामुळे नुकसान होणार असून त्याचा विकासावरही परिणाम होऊ शकतो, असे लंके यांनी पवारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनेनेही या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. देशाच्या संरक्षण विभागात या संस्थेचे महत्त्व मोठे आहे. नगरमध्ये शेकडो एकर जागेत ही संस्था विस्तारली आहे. या संस्थेचे येथून स्थलांतर झाल्यास या जागेचे काय होणार, की या जागेसाठीच स्थलांतर केले जात आहे, असेही प्रश्न उपस्थित केले जात आहे.