बुलढाणा/प्रतिनिधी : या देशाचे मूळ निवासी असलेल्या बहुजन समाजाच्या सर्व समस्यांचे समूळ उच्चाटन होणे जोपर्यंत विषमतावादी व्यवस्था जिवंत आहे त...
बुलढाणा/प्रतिनिधी : या देशाचे मूळ निवासी असलेल्या बहुजन समाजाच्या सर्व समस्यांचे समूळ उच्चाटन होणे जोपर्यंत विषमतावादी व्यवस्था जिवंत आहे तोपर्यंत तरी शक्य नाही. माणसा माणसात भेद करणारी, माणसाला माणसापासून दूर लोटणारी अन्यायकारी आणि अमानवीय अशी ही व्यवस्था उलथवून टाकण्यासाठीच वेळोवेळी जन्मलेल्या महापुरुषांनी संघर्ष केला. महापुरुषांनी दाखविलेल्या संघर्षाच्या वाटेवर चालून महापुरुषांचे व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्न पूर्ण करणे हा उद्देश्य घेऊनच आपण कामाला लागलो असल्याचे प्रतिपादन समाज समता संघाचे संस्थापक विलास गरुड यांनी केले.
बुलढाणा येथील शासकीय विश्राम गृहात समाज समता संघाची बैठक नुकतीच पार पडली. संघटनेचे संस्थापक विलास गरुड अध्यक्षस्थानी होते. तर आनंद तेलंग, प्रशांत सोनवणे, गजानन अवसरमोल, रुपराव नाटेकर, प्रवीण जाधव, गजानन मोरे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. विलास गरुड व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गरुड साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज देशाची अवस्था अतिशय वाईट आहे. भारतीय संविधान जाळले जात आहे. आरक्षण संपविले जात आहे. सर्वोच्य न्यायालय, निवडणूक आयोग, मिडिया सत्ताधारी पक्षाच्या हातचे बाहुले बनले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागे इडी, सीबीआय, इन्कमटॅक्सची भीती दाखवून त्यांना कमकुवत केले जात आहे. आंबेडकरी चळवळीतील अनेक बुद्धीजीवी लोकांना नक्षलवादी ठरवून जेल मध्ये टाकले जात आहे. सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करून आरक्षण संपविण्याचा घाट घातला जात आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या मिशनरी कार्यकर्त्यांची फौज तयार करावी लागेल. भविष्यात अशी फौज निर्माण करून समाजातील विषमतावादी व्यवस्था नष्ट करून समतावादी व्यवस्था निर्माण केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांनी महापुरुषांच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पोटच्या पोरांची पर्वा न करता समाज हितासाठी संघर्ष केला. जाती जातीत विखुरलेला समाज ही मानुवाद्यांसाठी पोषक बाब आहे हे ओळखून जाती अंताची लढाई उभी केली. शोषित आणि वंचीताना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि 21 व्या शतकात मान्यवर कांशीरामजी यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्य स्वार्थच त्यागला नाही तर सर्वोच्य बलिदान सुद्धा दिले. आम्ही मात्र ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी आणि खासदारकी मिळविण्यासाठी या विषमतावादी व्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्यांच्या पायावर जाऊन लोळण घेतो. समाजाने महापुरुषांच्या त्याग आणि बलिदानाची जाणीव ठेवायला हवी. बाबासाहेबांनी समाज समता संघ ४ सप्टेबर १९२७ रोजी स्थापन केला होता. बाबासाहेबांचा कारवा पुढे नेण्यासाठीच समाज समता संघाच्या माध्यमातून समाजातील बुद्धीजीवी वर्गाने या चळवळीत सामील व्हावे असे आवाहन यावेळी विलास गरुड यांनी केले. प्रास्ताविक आनंद तेलंग यांनी, सूत्रसंचालन रुपराव नाटेकर यांनी तर आभारप्रदर्शन प्रवीण जाधव यांनी केले.
प्रशांत सोनवणे यांचे कडे पदभार यावेळी सत्यशोधक शेतकरी सभेचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा मूलनिवासी मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सोनवणे यांची समाज समता संघाच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
राजुरा येथे सुद्धा कार्यक्रम राजुर ता. मोताळा येथील बुद्धविहारात समाज समता संघाचा प्रबोधनपर कार्यक्रम झाला. यावेळी मोठ्या संख्येने महिला मंडळ व बौध्द समाज बांधव उपस्थित होते. विलास गरुड यांनी याप्रसंगी संघटना स्थापन करण्यामागील उद्देश सांगितला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत सोनवणे यांनी तर सूत्र संचालन प्रवीण जाधव व आभार प्रदर्शन आमदार मेढे यांनी केले.