शिराळा / प्रतिनिधी : गावच्या विकासाठी हेवेदावे, मतभेद विसरून पंचसूत्रीचा मेळ घालत एक दिलाने काम केल्यास कोणतंही गाव विकासापासून वंचित राहू श...
शिराळा / प्रतिनिधी : गावच्या विकासाठी हेवेदावे, मतभेद विसरून पंचसूत्रीचा मेळ घालत एक दिलाने काम केल्यास कोणतंही गाव विकासापासून वंचित राहू शकत नाही. असे प्रतिपादन पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले. ते कोकरूड, ता. शिराळा येथे शिवाजीराव देशमुख व्याख्यानमालेत प्रथम पुष्प गुंफताना बोलत होते. प्रारंभी सरस्वती पुजन झाल्यानंतर स्व. शिवाजीराव देशमुख यांनी समाज्यासाठी केलेल्या विकासकामांची चित्रफित दाखवण्यात आली. अध्यक्षस्थानी तामिळनाडू सरकारचे सचिव आनंद पाटील होते. यावेळी युवा नेते सत्यजित देशमुख, जि. प. सदस्य संपतराव देशमुख, फत्तेसिंगराव देशमुख प्रमुख उपस्थित होते.
पेरे-पाटील पुढे म्हणाले की, सरपंच कोणत्याही पक्षाचा असू द्या, तो सर्वांना सोबत घेऊन जाणारा असावा
. आजच्या काळात पद, पैसा, प्रतिष्ठा याला किंमत नाही तर तुम्ही तुमच्या सोबत किती जणांना घेऊन काम करता याला किंमत आहे. सर्वांना सोबत घेऊन काम कराल तरच गांव समृध्द होणार आहे दिवंगत शिवाजीराव देशमुख यांच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे नाव होते. त्यांच्या स्वप्नातले कोकरूड घडवायचे असेल तर ग्रामपंचायत कमिटीने पाटोदा सारख काम करणे आवश्यक आहे. सरपंच आणि कमिटीने मिळून गावाला विश्वासात घेऊन काम करण्याचे ठरवले तरच गांव समृध्द होईल, गांवगाडा चालवण्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन जावे. कोणतेही काम करताना आनंदाने करा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावामध्ये स्वच्छता ठेवा. जिथे जागा असेल तेथे फळझाडे लावा. शौचालय बांधा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा. निराधार लोकांना आधार द्या. ग्रामपंचायत हे लोकांचे सेवा करण्याचे पवित्र मंदिर आहे.कष्टाशिवाय पर्याय नाही. आपले काम आपणच करायला शिका. लोकांच्या काय गरजा आहेत, त्याला प्राधान्य देऊन काम केल्यानेच आज पाटोदा गावाचे नाव राज्यात झाले आहे. त्यामुळे गाव समृध्द करायचे असेल तर सरपंचांनी ग्रामसेवकासह सर्वांना विश्वासात घेेऊन काम करावे.
अध्यक्षीय भाषणात आनंद पाटील म्हणाले की, सरकारच्या अनेक योजना आहेत. त्या समजून घेऊन ग्रामपंचायत निधीचा वापर करताना प्राधान्यक्रम ठरऊन प्रामाणिकपणे विकासकामे करावीत. त्यामागे कोणताही हेतू ठेवू नये. काम केल्यास यश निश्चित मिळते आणि आत्मविश्वास वाढतो.
यावेळी शिराळ्याचे माजी सभापती बाळासाहेब पाटील पाटील, जि. प. सदस्य संपतराव देशमुख, फत्तेसिंगराव देशमुख, हणमंतराव पाटील, गजानन पाटील, श्रीरंग नांगरे, मोहन पाटील, नंदकुमार पाटील, सरपंच विलास वाघमारे, उपसरपंच पोपट पाटील, सुहास पाटील, उपसभापती बी. के. नायकवडी, बाजीराव शेडगे, अंकुश नांगरे, प्रा. ए. सी. पाटील, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार पाटील यांनी केले तर पाहुण्यांची ओळख ग्रामीण कथाकार बाबासो परीट व सूत्रसंचालन संजय घोडे-पाटील यांनी केले. आभार मोहन पाटील यांनी मानले. व्याख्यानापुर्वी अविषकार ग्रुपच्या वतीने सुश्राव्य भाव व भक्तीगीते सादर करण्यात आली. याप्रसंगी मुंबईचे पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांचे वडील पै. कै. नारायण नांगरे आबा यांचे स्मरणार्थ गरीब गरजू अशा 11 लोकांना वैद्यकिय मदत म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात करण्यात आले.