विशाल पाटील (कराड / प्रतिनिधी) : शुक्रवार, दि. 29 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाईमध्ये वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य तथ...
विशाल पाटील (कराड / प्रतिनिधी) : शुक्रवार, दि. 29 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाईमध्ये वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य तथा माजी मानद वन्यजीव रक्षक सातारा रोहन भाटे व वनपरिक्षेत्र अधिकारी भरारी पथक सचिन डोंबाळे यांनी सुरूर फाटा ते वाई दरम्यान केलेल्या कारवाईत पाच शिकारी पकडण्यात आले. त्यांच्याकडून एका खवले मांजर ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाईमध्ये संशयितांनी वापरलेली महेंद्रा झायलो व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य तथा माजी मानद वन्यजीव रक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी भरारी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या अधारे दुर्मिळ असे जिवंत खवल्या मांजर विक्रीसाठी येणार असल्याचे समजले होते. त्यानुसार वाई ते सुरूर फाटा रस्त्यावर हॉटेल वाई वेस्टर्न फूड मॉल जवळ सापळा रचण्यात आला. संशयित विक्री करण्यासाठी जिवंत खवल्या मांजर लपवून ठेवलेल्या जागेवरून दुचाकीवरून पोत्यामध्ये काही अंतर घेऊन आले. त्यानंतर चार चाकी वाहनातून पुढे घेऊन आले. ही चार चाकी गाडीमध्ये विक्रीसाठी आल्यावर आणलेल्या पोत्यामध्ये जिवंत खवल्या मांजर असलेली खात्री झाल्यावर तात्काळ झटापट करून पाचजणांना अटक करण्यात आली आहे. या झटापटीत एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
कारवाईमध्ये दिलीप बाबुराव मोहिते (वय 50, रा. पिंपोडे बु, ता. कोरेगाव, जि. सातारा), वसंत दिनकर सपकाळ (वय 50, रा. धावडी, ता. वाई, जि. सातारा), भिकाजी जगन्नाथ सूर्यवंशी (वय 34, रा. भालेकर, ता. वाई, जि. सातारा), प्रशांत भीमराव शिंदे (वय 44, शिरगाव, ता. वाई, जि. सातारा), अक्षय दिलीप मोहिते (वय 23, रा. पिंपोड बु।, ता. कोरेगाव, जि. सातारा) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान त्यांच्याकडून तस्करी करून विक्रीसाठी आणलेले दुर्मिळ खवल्या मांजर हस्तगत करण्यात आले आहे. खवल्या मांजराच्या तस्करीसाठी वापरलेली महेंद्रा झायलो व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. संशयितांनी या पूर्वी असे अनेक कारनामे केले असल्याची परिसरात चर्चा आहे. या घटनेचा अधिक तपास वन्यजीव विभागाचे अधिकारी करत आहेत.