पुणे : राज्यात जानेवारी अखेरपर्यंत लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाची परवानगी न घेता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या 11 जा...
पुणे : राज्यात जानेवारी अखेरपर्यंत लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाची परवानगी न घेता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या 11 जानेवारी रोजी संलग्नित महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे दोन परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात संभ्रम वाढला आहे. राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून परवानगी न घेता पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेतल्याने, त्यांचाच निर्णय आता अंगलट आला आहे. याप्रकरणी उच्च शिक्षण विभागाने पुणे विद्यापीठाला खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
पुणे विद्यापीठाने घाईत महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. याउलट विद्यापीठ अनुदान आयोगाने स्थानिक परिस्थिती आणि राज्य शासन नियमाच्या अधिन राहून महाविद्यालय सुरू करण्यास मुभा दिली आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने महाविद्यालये सुरू करण्याचा कोणताच निर्णय घेतलेला नाही. परंतु, राज्य शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत पुणे विद्यापीठाने थाटात महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.