अहमदनगर/प्रतिनिधी: नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला या वेळी प्रथमच पक्षीय रंग आला असून भाजपविरुद्ध महाविकास आघाडी, ...
अहमदनगर/प्रतिनिधी: नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला या वेळी प्रथमच पक्षीय रंग आला असून भाजपविरुद्ध महाविकास आघाडी, असे स्वरूप प्राप्त होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्वबळावर निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्याने आता ही बँक ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
फडणवीस यांना भेटलेल्या नेत्यांत राधाकृष्ण विखे, शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, प्रा. राम शिंदे आदींचा समावेश आहे; परंतु विखे बबनराव पाचपुते वगळता अन्य नेत्यांचा त्यांच्या त्यांच्या तालुक्यात पराभव झाला आहे. शिवाय संस्थात्मक बळ त्यांच्याकडे नाही. पाचपुते यांच्या तालुक्यातही महाविकास आघाडीची ताकद संस्थात्मक संघटनांत जादा आहे. कोपरगाव तालुक्यात मात्र आ. आशुतोष काळे आणि बिपीन कोल्हे यांची संस्थात्मक ताकद आहे. मोनिका राजळे यांचीही अशीच ताकद पाथर्डी तालुक्यात आहे. पिचड भाजपत असले, तरी त्यांचाही विधानसभेला पराभव झाला आहे.
जिल्हा बँकेवर आतापर्यंत थोरात यांचेच वर्चस्व राहिले आहे. दोन्ही काँग्रेस एकत्र असताना राधाकृष्ण विखे यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळाले होते. त्यानंतर त्यांनी वारंवार प्रयत्न करूनही त्यांना जिल्हा बँकेची सत्ता मिळविता आलेली नाही. पिचड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, त्यामुळे सीताराम गायकर यांना अध्यक्षपद मिळाले. राष्ट्रवादीतून बाहेर गेलेल्यांची मोट बांधून जिल्हा बँक ताब्यात घेणे वाटते तेवढे सोपे नक्कीच नाही. फडणवीस यांनी लक्ष घातल्याने आता पवार यांनाही लक्ष घालावे लागेल. थोरात आणि पवार एकत्र असल्यास जिल्हा बँकेत त्यांच्या सत्तेला सुरुंग लावणे तितकेसे सोपे नाही.
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली असली, तरी त्यापूर्वीच प्रक्रिया सुरू झालेल्या नगरच्या जिल्हा बँकेची निवडणूक मात्र होणार आहे. संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत 25 जानेवारी आहे. 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील आजीमाजी आमदार आणि नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.