कर्जत/प्रतिनिधी : बहुजन समाज पार्टीच्या वतीने सोमवारी कर्जत नगरपंचायतसमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. महिलांसाठी सार्वजनिक श...
कर्जत/प्रतिनिधी : बहुजन समाज पार्टीच्या वतीने सोमवारी कर्जत नगरपंचायतसमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. महिलांसाठी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था व्हावी, राजीव गांधी नगर येथील घरांची क्वालिटी कंट्रोल यांच्याकडून चौकशी व्हावी. राजीव गांधी नगर येथील सर्व भागांची स्वच्छता करण्यात यावी, रमाई आवास योजना तात्काळ चालू करण्यात यावी, 20 वर्षांपासून राहत असलेल्या लोकांच्या नावावर घरे नाहीत त्यांच्या नावावर घरे करावीत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी आंदोलकांशी चर्चा केली. बसपाचे जिल्हा सचिव शंकर भैलुमे, युवकचे तालुकाध्यक्ष गोरख भैलुमे यांच्यासह महिलांनी जाधव यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांना लेखी पत्र देण्यात आले. पत्रात म्हटले आहे, महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी शासकीय अनुदान मिळाल्यावर बांधकाम करण्यात येईल, तेथील परिसर स्वच्छ करण्यात येईल. त्याचप्रमाणे राजीव गांधी नगरमधील बांधकामे खासगी व्यक्तीच्या मालकीची असल्याने व कर्जत नगरपंचायतकडे क्वालिटी कंट्रोलची सुविधा उपलब्ध नसल्याने शासकीय विभागामार्फत ही चौकशी करावी. रमाई आवास योजना चालू करण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग व जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे. नगरपंचायतकडे या योजनेसंदर्भात कोणतीही पेंडेंसी नाही, त्यामुळे या योजनेबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे चौकशी करावी. लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.