सातारा / प्रतिनिधी : मुंबईस्थित फायनान्शियल सर्व्हिसेस चालविणार्या एका कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील हायप्रोफाईल गटातील अनेकांना कोट्यवध...
सातारा / प्रतिनिधी : मुंबईस्थित फायनान्शियल सर्व्हिसेस चालविणार्या एका कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील हायप्रोफाईल गटातील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर येत आहे. जास्त व्याजाच्या व थोड्या काळात दुप्पट पैसे होण्याच्या आमिषांना बळी पडलेल्या या लोकांची अवस्था हाती धुपाटणे उरल्यासारखी झाली आहे. विशेष म्हणजे एकट्या वाई तालुक्यात अडीच ते तीन कोटी रुपयांची गुंतवणूक करणार्यांची फसवणूक झाली आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील फसवणुकीचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमध्ये उद्योग-धंदे बंद राहिले. त्यामुळे अनेकांना व्यापारात फटका बसला, अनेकांच्या नोकर्या गेल्या किंवा पगार कपात झाली. याच कालावधीत सातारा जिल्ह्यातून शेअर मार्केटमधून जादा पैसे कमविण्याच्या आमिषाने कोट्यवधीची गुंतवणूक झाली. परंतू आता संबंधित कंपनीकडून पैसे मिळणे बंद झाले. तसेच याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल झाल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. पैशांची कोंडी झाल्यामुळे संबधितांनी आता पोलिसांकडे धाव घेण्यास सुरवात केली आहे. संबंधित कंपनीचे मुंबई येथे कार्यालय आहे. डिमॅट अकाउंट काढून देणे, शेअर बाजार म्हणजे काय, शेअर म्हणजे काय, शेअर बाजारात कमी कालावधीत जादा पैसे कसे मिळवायचे, अशी माहिती देणारे क्लास सुरू केलेले अनेक व्हिडीओ कंपनीने यू ट्यूबवर अपलोड केलेले आहेत. कंपनीचा मालक सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह राहात असल्याचेही समोर येते आहे. विशेषतः मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऍड्रेस केलेले संदेशही आहेत. त्या माध्यमातून समाजसेवा करत असल्याचा व राज्य आणि राष्ट्रहिताचा संबंधित मालक विचार करत असल्याचे दिसते. परंतू प्रत्यक्षात फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून कमी कालावधीत जास्त पैसे मिळवून देण्याच्या आमिषातून राज्यभरातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक गोळा केल्याचे समोर येऊ लागले आहे.
या कंपनीने राज्यातील काही ठिकाणी कार्यालये, तसेच अन्य भागात पैसे जमा करणारे मध्यस्त उभे केल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. कमी कालावधीत म्हणजे सुमारे आठ ते दहा महिन्यांत रक्कम दुप्पट करण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखविण्यात आले होते. लोकांनी विश्वास ठेवावा म्हणून स्टॅम्प पेपरवर संबंधितांशी करारही केला जात होता.
(पान 1 वरुन) परताव्याच्या रकमेचे दर महिन्याचे आगाऊ चेक गुंतवणूकदाराला दिले जात होते. प्रारंभी गुंतवणूक करणार्यांचे पैसे, तसेच काही कालावधीत दुप्पट झाले. त्यांनी नजीकच्या अनेकांना पैसे गुंतविण्यास प्रवृत्त केले. काही दिवसांपूर्वी कंपनीवर मुंबईत फसवणूक व एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. आता आपले पैसे मिळणार का, असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला आहे. अनेकांनी आपली आयुष्यभराची पुंजीही यात लावली आहे. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत. गुंतवणूकदारांना न्याय मिळण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्तेही पुढे आले आहेत.