बारामती/प्रतिनिधीः टपाल खात्यात 2002 साली ठेवण्यात आलेली मृत व्यक्तीच्या नावावरील 100 रुपये ठेव काढण्यासाठी चक्क 600 रुपये खर्च येत आहे. ती ...
बारामती/प्रतिनिधीः टपाल खात्यात 2002 साली ठेवण्यात आलेली मृत व्यक्तीच्या नावावरील 100 रुपये ठेव काढण्यासाठी चक्क 600 रुपये खर्च येत आहे. ती ठेवच ’ नको रे बाबा’ अशी म्हणण्याची वेळ बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांवर आली आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 2002 साली प्रत्येक सभासदांच्या नावावर सहा वार्षिक राष्ट्रीय बचत पत्र यामध्ये सोमेश्वरनगर येथील टपाल कार्यालयात 100 रुपयांची ठेव ठेवण्यात आली होती. त्या बदल्यात सहा वर्षात सभासदांना त्याचे 201 रुपये 50 पैसे मिळणार असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले होते.
2002 ला सभासदांच्या नावावर असलेल्या टपाल खात्यातील ठेवीची माहिती सोमेश्वर कारखान्याच्या वित्त विभागाला अचानक आठवली. या कारखान्याने मुदत संपल्यानंतर तब्बल दहा वर्षे उशिरा या पावत्या सभासदांना दिल्या आहे. ठेव रक्कम असलेल्या सभासदामधील बहुतांश सभासद मृत झाले आहेत. सोमेश्वर कारखान्याचा एक सभासद पावतीवरील रक्कम काढण्यासाठी सोमेश्वरनगर येथील टपाल कार्यालयामध्ये गेला असता त्याला वेगळाच अनुभव आला. वडीलांच्या नावावरील 100 रुपये ठेवीची पावती घेऊन सभासद टपाल कार्यालयात गेला. त्याने पोस्ट मास्तरला पावती दाखवून वडील दहा वर्षापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले. तेव्हा पोस्ट मास्तरने सांगितले, की तुम्हाला एकूण या पावतीचे 175 रुपये मिळतील; मात्र त्यासाठी तुम्हाला त्यांचे आधारकार्ड आणावे लागेल. तेव्हा आधारकार्ड नव्हते, असे सांगितले. मग तुम्ही 400 रुपयांच्या स्टँपवर पेपरवर प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागेल, असे पोस्ट मास्तरने सांगितले. तसेच त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र ही लागणार असल्याची माहिती दिली. स्टँपपेपर व इतर कागदपत्रे आणि त्यासाठी वेळ वाया जाणार हे सभासदाच्या लक्षात आले. मिळणार्या पैशांचा आणि जाणार्या पैशांचा सभासदाने हिशोब केला. 175 रुपये मिळविण्यासाठी 600 रुपये खर्च येत असल्याचे सभासदाच्या लक्षात आले. खिशातील 425 रुपये जाणार असल्याने त्यांनी डोक्यावर हात मारत ते पैसे नको, असे म्हणत घर गाठले. सोमेश्वर कारखान्याच्या चुकीच्या कारभाराचा फटका सभासदांना बसला. शंभर रुपये ही रक्कम छोटी असली, तरी 18 वर्षांत किमान तिचे पाचशे रुपये तरी व्हायला हवे होते; परंतु 201 रुपयांऐवजी टपाल खाते 175 रुपयेच का देत आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.