पाकिस्तान दहशतवाद्यांना कायम पोसत असतो. जगाला दाखविण्यासाठी दहशतवाद्यांविरोधात कारवाईचं नाटक करायचं आणि त्याचवेळी त्यांना तुरुंगात पोसण्यासा...
पाकिस्तान दहशतवाद्यांना कायम पोसत असतो. जगाला दाखविण्यासाठी दहशतवाद्यांविरोधात कारवाईचं नाटक करायचं आणि त्याचवेळी त्यांना तुरुंगात पोसण्यासाठी लाखो रुपयांची बरसात करायची, हे आता जगाच्याही अंगवळणी पडलं आहे. त्यामुळं जेव्हा पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करतो, तेव्हा त्यामागं काहीतरी कुटील राजकारण आहे, हे लक्षात येतं.
अमेरिका, सौदी अरेबिया पूर्वी पाकिस्तानला वेगवेगळ्या कारणांसाठी भरपूर मदत करीत असे. गरिबी निर्मूलन, तसंच अन्य कारणांसाठी दिलेली मदत पाकिस्तान कायम दहशतवाद्यांना पोसण्यासाठी केला जात असतो. पाकिस्तान ही दहशतवाद्यांची जन्मभूमी आहे. पाकिस्तानमध्ये पोसलेले दहशतवादी जगभर धुडगूस घालतात. पाकिस्तानी दहशतवादाची किंमत भारत आणि अफगाणिस्तानला जास्त मोजावी लागते. अर्थात ती जगालाही कमी जास्त प्रमाणात मोजावी लागली. अमेरिकेतील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर हल्ला झाला. त्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन याचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तान घुसावं लागलं होतं. भारतानं पाकिस्तानच्या दहशतवादाचे पुरावे जगाला दिले. त्यामुळं जगाला त्याची दखल घ्यावी लागली. आता ‘फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स’नं (एफएटीएफ) दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली नाही, तर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानचा सध्या करड्या यादीत समावेश आहे. दहशतवाद्यांची खाती गोठविली नाहीत आणि त्यांच्यावर ठोस कारवाई केली नाही, तर पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश केला जाऊ शकतो. पाकिस्तानचा समावेश काळ्या यादीत झाला, तर जग त्याच्यावर बहिष्कार घालील. गुंतवणूकदार पाकिस्तानपासून फारकत घेतील. एफएटीएफची पुढच्या महिन्यात बैठक होणार आहे. त्यामुळं पाकिस्तानला काहीतरी कारवाई करतो आहोत, हे दाखवणं भाग आहे. त्यासाठी तर गेल्या काही वर्षापासून पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचं नाटक करतो आहे. एकीकडं दहशतवाद्यांची खाती गोठविल्याचं सांगितलं जात असताना दहशतवाद्यांना दरमहा खर्चासाठी लाखो रुपये दिले जातात. यापूर्वीही हाफिज सईद याच्यासह अन्य दहशतवाद्यांना अटक करण्याची कारवाई करण्यात आली होती; परंतु नंतर मात्र त्यांना सोडून देण्यात आलं होतं. त्यामुळंच आता दहशतवाद्यांना केली जात असलेली अटक आणि त्यांच्यावर ठेवले जात असलेले आरोप ही सारी धूळफेक आहे. मुंबई येथे 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड मानला जाणारा लष्कर-ए-तोयबाचा कमांडर जकी-उर-रहमान-लखवी याला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी पथकानं लखवीला दहशतवादाला पैसे पुरवण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. येत्या काही आठवड्यातच एफएटीएफची पुढची बैठक होणार आहे. या बैठकीत पाकिस्तानला करड्या यादीत ठेवायचं, की काळ्या यादीत टाकायचं, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जकी-उर-रहमान लखवी याला अटक करण्यात आली आहे. ‘फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स’ म्हणजेच एफएटीएफ ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेचा प्रमुख उद्देश आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी धोरण निश्चित करणं हा असतो. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर कट्टरतावादाला होणारा पैशांचा पुरवठा रोखण्यासाठीचा उद्देशही यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. लखवीवर एका औषधालयाच्या माध्यमातून दहशतवादासाठी पैसा जमा करण्याचा आरोप आहे. त्यानं औषधालयातून निधी गोळा करून त्याचा वापर दहशतवादी कारवायांना पैसा पुरवण्यासाठी तसंच खासगी उपयोगासाठीही केला.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं लखवीला प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीत टाकलेलं आहे. त्यामुळं विना-परवानगी तो कोणत्याही निधीचा वापर करू शकत नाही. या प्रकरणाची सुनावणी लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयात केली जाणार आहे. लखवीला झालेल्या अटकेवर भारतीय अधिकार्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ‘एफएटीएफ’च्या बैठकीच्या अगोदर दहशतवाद्यांना फक्त नावापुरती अटक केली जाते. हे आता नेहमीचंच झालं आहे. एप्रिल 2015 मध्ये मुंबई हल्ल्याचा कथित मास्टरमाईंड जकी-उर-रहमान लखवी याला अडियाला तुरुंगातून सोडण्यात आलं होतं. त्या वेळी लाहोर उच्च न्यायालयानं लखवीची नजरकैद संपवली. लखवीला दहा लाखांच्या दोन जातमुचलक्यांवर मुक्त करण्याचे आदेश त्या वेळी न्यायालयानं दिले होते. लखवी हाच 2008 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचं भारताचं म्हणणं आहे. या हल्ल्यानंतर 7 डिसेंबर 2008 ला लखवीला पाकिस्तानात अटकही झाली होती. पाकिस्तान बर्याच काळापासून ‘एफएटीएफ’च्या करड्या यादीमध्ये आहे. या कृती दलाची शेवटची बैठक नोव्हेंबरमध्ये झाली होती. त्यानंतर पाकिस्तान सरकारनं सादर केलेल्या अहवालावर एफएटीएफ समाधानी नव्हता. या संघटनेनं म्हटलं होतं, की पाकिस्तान सरकारनं अद्याप बर्याच अटी पूर्ण केल्या नाहीत. टेरर फंडिगवर जी काही कारवाई केली, त्याचे पुरावे द्यावे लागतील. लखवी यांच्यावर कारवाई केल्याचं दाखवून पाकिस्तानचा करड्या यादीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न आहे. आता पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचं दाखवित असताना गेल्या दोन महिन्यांपूर्वीच पाकिस्तान सरकारनं मुंबई हल्ल्यातील दहशतवादी सूत्रधार झाकीउर रेहमान लखवीला दरमहा दीड लाख रुपये देणार असल्याचं जाहीर केलं होतं. पाकिस्तान सरकारनं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे (यूएनएससी) कडं लखवीला मानवतावादी कारणास्तव दीड लाख रुपये देण्याची परवानगी मागितली होती. ‘यूएनएससी’नं त्याला मान्यता दिली. लखवी व्यतिरिक्त माजी अणु अभियंता महमूद सुलतान बशीरुद्दीन यांनाही ही रक्कम मिळणार आहे. हाफिज सईद आधीच या सुविधेचा लाभ घेत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादी यादीमध्ये लखवीचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांनीही त्याच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. सुरक्षा परिषदेनं बंदी घातलेल्या दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांसाठी काही नियम तयार केले आहेत. जर ते तुरूंगात असतील, तर त्यांना मूलभूत सुविधांसाठी पैसे दिले जाऊ शकतात. इम्रान खान सरकार या नियमाचा लाभ घेत आहे. बशीरुद्दीनवर अल कैदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याची भेट घेतल्याचा आरोप आहे. त्याला पाकिस्तानचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान (सीते-ए-इम्तियाज) देखील मिळाला आहे. गेल्या वर्षी मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्ताननं असंच गौरविलं होतं. लखवीला उदरनिर्वाहासाठी 50 हजार, औषधांसाठी 45 हजार, इतर सुविधांसाठी 20 हजार, वकीलाच्या फीसाठी 20 हजार आणि प्रवास भत्ता म्हणून 15 हजार रुपये मिळतील. एकीकडे दहशतवाद्याला पोसायचं आणि दुसरीकडं त्याच्या अटकेचं नाटक करायचं, ही धूळफेक आहे.
पाकिस्ताननं आपल्या टेरर वॉच लिस्टमधून हजारो दहशतवाद्यांची नावं काढून टाकली आहेत. ‘फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स’ (एफएटीएफ) पाकिस्ताननं दहशतवाद्यांना वित्तपुरवठा प्रकरणी उचललेल्या उपायांचा आढावा घेणार आहे. आपल्या दहशतवाद्यांना कारवाईपासून वाचवण्यासाठी पाकिस्ताननं हे पाऊल उचललं असल्याचा विश्वास आहे. पाकिस्तानच्या ‘नॅशनल काउंटर टेररिझम अथॉरिटी’नं (एनसीटीए) ही यादी कायम ठेवली आहे. आर्थिक संस्थांना संशयित दहशतवाद्यांशी व्यवहार करण्यापासून रोखणं हे त्याचं उद्दीष्ट आहे. 2018 च्या पाकिस्तानच्या टेरर वॉच लिस्टमध्ये दहशतवाद्यांची नावं 7600 होती. गेल्या 18 महिन्यांत ही घटून 3800 झाली आहे. यावर्षी मार्चच्या सुरुवातीपासूनच सुमारे 1800 नावं काढली गेली आहेत. ही नावे हटविण्याचं कोणतंही कारण देण्यात आलं नाही. अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या यादीतील अनेक दहशतवाद्यांची नावं काढली गेली. वॉल स्ट्रीट जर्नलच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान यादीतून काढून टाकलेल्या बर्याच दहशतवाद्यांची नावं अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांच्या बंदी घातलेल्या याद्यांमधील दहशतवाद्यांची नावं सारखीच आहेत. या यादीतून पाकिस्ताननं दहशतवादी झाका-उर-रहमानचं नाव काढून टाकलं असून अमेरिकेच्या यादीमध्ये लष्कर-ए-तैयबाचा सेनापती झाकी-उर-रहमान यांचा समावेश आहे. ‘एफएटीएफ’नु आतापर्यंत दहशतवाद्यांविरूद्ध पाकिस्तानची कारवाई पुरेशी नसल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तान या यादीतून बाहेर पडण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करीत आहे; परंतु त्यासाठी आपल्या दहशतवाद्यांविरूद्ध कोणतीही कारवाई करायची इच्छा नाही. तो फक्त अतिरेक्यांवर कारवाईचं नाटक करतो. लखवी यानं हाफिजला मुंबई हल्ल्याचा सारा कट आखून दिला होता, असं सांगितलं जातं. मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 मध्ये हल्ले झाले होते. या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला आणि तीनशे लोक जखमी झाले होते. 26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री दहशतवाद्यांनी मुंबईत एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाऊस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या परिसरात हल्ले झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगाव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट घडवून आणला होता. जकीउर रहमना लखवी हा या हल्ल्याचा मास्टरमाइंड असून त्याचा मुंबई पोलिस शोध घेत होते. भारत सरकारनं त्याला सप्टेंबर 2019मध्ये दहशतवादी घोषित केलं होतं. तुरुंगात असतानाही त्याच्या दहशतवादी कारवाया सुरूच होत्या. आता त्याला टेरर फंडिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अतिरेक्यांना मदत आणि आर्थिक रसद पोहोचवल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. हल्ले करणार्या दहापैकी नऊ दहशतवाद्यांना मुंबई पोलिस आणि एनएसजीच्या कमांडोंनी कंठस्नान घातलं तर अजमल आमीर कसाब हा दहशतवादी पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते आणि या हल्ल्यामागं लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता.