अहमदनगर/प्रतिनिधी: भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ आता काँग्रेसनेही पक्ष विस्तारासाठी उपक्रम घ्यायला सुरुवात केली आहे. प्र...
अहमदनगर/प्रतिनिधी: भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ आता काँग्रेसनेही पक्ष विस्तारासाठी उपक्रम घ्यायला सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक ते सात फेब्रुवारी या काळात काँग्रेस बळकटीकरण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये लोकसंपर्कासह विविध उपक्रम होणार आहेत. पक्षासोबतच प्रदेशाध्यक्ष म्हणून थोरात यांच्या नेतृत्वालाही बळकटी देण्याचा प्रयत्न यामागे आहे.
सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षविस्तारासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. अनेकांचे पक्षप्रवेश झाले. तुलनेत काँग्रेसमधील हालचाली थंडच होत्या. आता मात्र, काँग्रेसनेही हालचाली सुरू केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या पक्षप्रवेशानंतर काँग्रेस बळकटीकरणासाठी उपक्रमही सुरू करण्यात येत आहेत. यासाठी थोरात यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधण्यात आले आहे. नगरला जिल्हा काँग्रेसतर्फे एक ते सात फेब्रुवारी हा काँग्रेस बळकटीकरण सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या काळात सर्वसामान्यांसाठी उपयुक्त उपक्रम, आरोग्य शिबिरे, वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रम, गावागावांत नव्या शाखा उघडणे असे कार्यक्रम होणार आहेत. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कामाला सुरवात करण्यात आली आहे. डॉ. तांबे यांच्यासह आमदार लहू कानडे, बाजीराव खेमनर, ज्ञानदेव वाफारे, मधुकर नवले, सुरेश थोरात, दादा पाटील वाकचौरे, इंद्रभान थोरात, हिरालाल पगडाल, डॉ. एकनाथ गोंदकर यांच्यासह नाशिक विभागातील पाचही जिल्हयांतील पदाधिकारी यासाठी पुढाकार घेत आहेत. या कालावधीमध्ये प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषद गट व गण निहाय विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, भाषण स्पर्धा, नोकरी मेळावा, मॅरेथॉन स्पर्धा, क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. गाव तेथे सक्रिय काँग्रेस कार्यकर्त्यांची शाखा, युवक काँग्रेसच्या विविध शाखांची स्थापनाही होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले विविध निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणे, महसूल मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची विचारधारा अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवताना केलेली लोकोपयोगी कामे लोकांना सांगणे असे उपक्रम होणार आहेत. याबद्दल डॉ. तांबे म्हणाले, की काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा असून हा पक्ष अगदी तळागाळापर्यंत पोहोचला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे धोरणात्मक निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या काँग्रेस बळकटीकरण सप्ताहाचा अधिक चांगला उपयोग करावा. प्रत्येक तालुक्यात किमान 20 शाखा नव्याने उघडण्याचे नियोजन आहे.