रयत संघटनेचा आधारवड हरपला; कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे निधन कराड/प्रतिनिधी : माजी सहकार मंत्री विलासराव पाटील-उंडा...
रयत संघटनेचा आधारवड हरपला; कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे निधन
कराड/प्रतिनिधी : माजी सहकार मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सोमवारी पहाटे सातारा येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. सातारा येथे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माजी मंत्री विलासराव पाटील यांचे निधन झाल्याचे वृत्त सकाळी शहरासह तालुक्यात पसरले. कार्यकर्त्यांसह उंडाळकरप्रेमी जड अंःतकरणाने सातार्याकडे जाण्यासाठी निघाले होते. मात्र, कराड येथील शेती उत्पन्न बाजार समिती येथे पार्थिव आणण्यात येणार असल्याचा निरोप आल्यानंतर कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या आवारात गर्दी केली. सायंकाळी पाचच्या सुमारास उंडाळे येथील मूळ गावी विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या निधनाने कराड दक्षिण मतदार संघातील राजकारणातील हरपल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात होती. तर रयत संघटनेचा आधारवड हरपला.
माजी सहकार मंत्री विलासराव पाटील यांचे पार्थिव सकाळी साडेअकरानंतर येथील शेती उत्पन्न बाजार समितीत आणण्यात आले. यावेळी उंडाळकर प्रेमी व कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. अरुण लाड, माजी खासदार राजू शेट्टी, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, चित्रपट अभिनेते रितेश देशमुख, विनायक भोसले, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, मलकापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, अजितराव पाटील-चिखलीकर, प्रांताधिकारी उत्तम दिघे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, कराड पालिकेचे नियोजन सभापती विजय वाटेगावकर, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेवक सुहास जगताप, अतुल शिंदे, माजी नगराध्यक्ष शारदा जाधव आदींसह मान्यवर, कार्यकर्त्यांनी साश्रूनयनांनी पार्थिवाचे दर्शन घेतले.
संभाव्य गर्दी लक्षात घेऊन तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच अंत्यदर्शन घेण्यासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. तेथे सामान्य कार्यकर्त्यांसह मान्यवरांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्याची सोय केली होती. पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अनेकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी कार्यकर्त्यांनीही अंत्यदर्शनासाठी मोठी रांग लागली होती. महिलांची संख्याही लक्षणीय होती. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी पर्थिवाशेजारी असणार्या ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे सांत्वन करत होते.
दरम्यान, पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लोकांनी केलेल्या गर्दीमुळे पोलिसांनी मार्केट यार्ड गेट क्रमांक एक समोरून कार्वे रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. बैल बाजार रस्त्याने ही वाहतूक वळवण्यात आली होती. दरम्यान, तालुक्यासह बाहेर गावाहून येणार्या कार्यकर्त्यांची वाहने मार्केट यार्ड परिसरातील रस्त्यावर लागली होती. फुलांनी सजवलेल्या वाहनातून उंडाळकर यांचे पार्थिव उंडाळे येथे नेल्यानंतर उंडाळकर हायस्कूल परिसरात अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते.
...............