मुंबई/प्रतिनिधीः महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवल्याने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष स...
मुंबई/प्रतिनिधीः महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवल्याने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी नाराज असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सोनिया या निर्णयाच्या बाजूने नाहीत. दोन दिवसांपूर्वीच थोरात यांनी काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेऊन महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले होते.
सोनिया गांधी यांनी संबंधित नेत्यांची चांगलीच कानउघाडणी केलीय. थोरात यांच्या राजीनाम्याची मागणी कोणी केली, असा सवाल त्यांनी काँग्रेसच्या ‘त्या’ नेत्यांना विचारला. संकटाच्या काळात पक्षाला जास्त साथ देणार्या नेत्यांपैकी थोरात एक आहेत. खरे तर थोरात यांच्या राजीनाम्याच्या मागणीमागे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी असल्याचे समजते. थोरात हे ठाकरे सरकारमध्ये महसूलमंत्री असतानाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षसुद्धा आहेत. तसेच काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील नेतेही आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र काँग्रेसमधील एक गट त्यांच्या विरोधात काम करतो आहे. एवढी सगळी पदे थोरात यांच्याकडे कशाला, असाही काँग्रेसमध्ये एक मतप्रवाह आहे. थोरात यांचे भाचे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे काही बडे नेते थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदा सोडावे यासाठी दबाव आणत आहेत. त्यामुळे थोरात यांनी दोन दिवसांपूर्वी के. सी. वेणुगोपाल यांना भेटून राजीनामा देण्याची तयारी दाखविली होती. थोरात यांनी आपल्यावर अतिरिक्त जबाबदार्या असल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाचा भार कमी करण्यात यावा, अशी इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी तरुण नेत्याला संधी द्यावी. आम्ही त्याच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहू, असे त्यांनी म्हटले होते. प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि राहुल गांधी यांचे विश्वासू राजीव सातव यांची नावे चर्चेत होती.