कराड / प्रतिनिधी : कराडमधील अभिनंदन झेंडे टोळीवर तडीपारीची कारवाई झाल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली होती. दरम्यान, शहर व परिसरातील ...
कराड / प्रतिनिधी : कराडमधील अभिनंदन झेंडे टोळीवर तडीपारीची कारवाई झाल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली होती. दरम्यान, शहर व परिसरातील गुन्हेगारी संपविण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली असून इतर गुन्हेगारी टोळ्या व गुंड पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांच्यावर तडीपारीसह इतर कारवाया करणार असल्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि विजय गोडसे यांनी सांगितले.
कराड शहर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. या शहरासह तालुक्यात सुमारे 11 गुन्हेगारी टोळ्यांची पोलीस दप्तरी नोंद आहे. काही टोळ्यांमधील गुन्हेगारी संपत आली आहे. तर अजूनही काही टोळ्या सक्रिय आहेत. या गुन्हेगारी टोळ्यांचे महाविद्यालयीन युवकांमध्ये आकर्षण असते. त्यातूनच मग भाई, दादा यांची दादागिरी वाढते. वर्चस्ववादातून पुढे टोळीयुध्द भडकते. काही दिवसांपूर्वी कराड शहरात गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वर्चस्ववादातून खून, खुनी हल्ला, खंडणी, मारामारी अशा घटना घडल्या होत्या. त्यातून नागरिकांना वेठीस धरले जात होते. परंतू, डीवायएसपी सुरज गुरव यांच्यानंतर आता डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील यांनी गुन्हेगारी टोळ्यांना टार्गेट केले. त्यातूनच मग काही दिवसांपूर्वी शहरातील सोळवंडे टोळी व शेख टोळीवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली. तर त्यानंतर आता अभिनंदन झेंडे टोळीला तडीपार करत गुन्हेगारी संपवण्याच्या दृष्टीने पावले उचलली.
गुन्हेगारी टोळ्या, त्यांचे कारनामे व गुंडांच्या समर्थकांवर पोलिसांची बारीक नजर असून आणखी काही गुंड व गुन्हेगारी टोळ्या पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सपोनि विजय गोडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.