फडतरवाडीच्या तिघांच्यावर वनविभागाकडून गुन्हा दाखल कराड / प्रतिनिधी :घोरपड या प्राण्याची शिकार करून त्यांचे मटन करून खाणार्या तिघांना वनवि...
फडतरवाडीच्या तिघांच्यावर वनविभागाकडून गुन्हा दाखल
कराड / प्रतिनिधी :घोरपड या प्राण्याची शिकार करून त्यांचे मटन करून खाणार्या तिघांना वनविभागाच्या अधिकार्यांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे घोरपडीचे मटन खाणे चांगलेच महागात पडले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांढरेवाडी-वजरोशी (ता. पाटण) येथील विनोद घाडगे या नावाच्या व्यक्तीने मौजे फडतरवाडी (घोट) येथे शिकार करून आणलेल्या घोरपडीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले होते. यांची माहीती गोपनीय पध्दतीने मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना मिळाली होती. त्यावरून पाटणचे वनविभागाचे अधिकारी वनक्षेत्रपाल विलास काळे, ढोरोशीचे वनपाल अशोक राऊत, वनरक्षक रविंद्र कदम, वनरक्षक अरविंद जाधव व इतर दोन व्यक्तींनी सापळा रचून फडतरवाडी (घोट) येथून विनोद घाडगे यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान वन्य प्राण्याची शिकार केलेल्या भाऊ गंगाराम साळुंखे, गणपत मारूती साळुंखे, सिंधु गणपत साळुंखे यांना ताब्यात घेवून गणपत मारूती साळुंखे यांच्या राहत्या घरात घोरपडीचे शिजवलेले मटन ताब्यात घेतले. अल्यमिनइमचे पातेले, कोयता व लाकडी ठोकळा इतर साहित्य जप्त केले. घटनास्थळांचा पंचनामा करून भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 नुसार गुन्हा नोदविंला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक किरण कांबळे हे करत आहेत