20 वर्षापासून बिनविरोधची परंपरा कायम पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील वनकुसवडे डोंगर पठारावर दुर्गम व डोंगराळ भाग अशी ओळख असलेल्या कारवट...
20 वर्षापासून बिनविरोधची परंपरा कायम
पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील वनकुसवडे डोंगर पठारावर दुर्गम व डोंगराळ भाग अशी ओळख असलेल्या कारवट या 800 लोकसंख्या असलेल्या गावाने नारीशक्तीचा सन्मान करून राज्यात एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. कारवट ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून बिनविरोधची परंपरा याही वर्षी अखंडपणे सुरू असून यावेळी सर्वच सात जागांवर महिलांना संधी दिल्याने कारवट ग्रामपंचायतीवर महिला राज आले आहे.
स्थापनेपासून आजवर येथील ग्रामस्थांनी बिनविरोधची परंपरा कायम ठेवत यावेळी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महिला सुध्दा चांगला कारभार करतील, असा विश्वास ठेवून सर्वच जागी महिला कारभारी देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. पाच जागी महिला सदस्य बिनविरोध निवडून दिल्या आहेत तर दोन जागा तांत्रिक कारणामुळे रिक्त राहणार आहेत.
गावचे सुपुत्र, माजी पंचायत समिती सदस्य स्व. शामराव दादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2000 मध्ये घाणबी गृप ग्रामपंचायतमधून विभक्त करण्यासाठी दत्ताराम शिंदे, रमेश शिंदे, रवींद्र शिंदे, राजेश शिंदे, जिजा कदम यांच्या व ग्रामस्थांच्या, मुंबईकर मंडळी यांच्या सहकार्याने प्रयत्न केले. तेंव्हापासून आज अखेर पर्यंत झालेल्या पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
या वर्षीच्या निवडणुकीत सातही सदस्यपदी महिलांना संधी देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकमुखी घेतला, ग्रामपंचायत स्थापनेपासून आजवर दत्ताराम भाऊ शिंदे, मारुती दगडू शिंदे, हैसाबाई धाऊ अनुसे, रमेश शिंदे, सिताराम शिंदे, उषा रवींद्र शिंदे यांनी सरपंच पदाचा कार्यभार यशस्वी पणे सांभाळला. संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव, निर्मल ग्राम अभियान, वनग्राम, सांडपाणी व्यवस्थापन, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प यासह अनेक शासनाच्या अभियानात गावाने भाग घेऊन बक्षिसे मिळविली आहेत. अर्ंतगत रस्ते, गटारे, नळ योजना, समाज मंदीरे आदी मुलभुत सुविधा गावात पोहचल्या आहेत.
आजवरच्या कारभार्यांनी शासनाच्या माध्यमातून तर कधी लोकवर्गणीतून तून कामे करून गावचा चौफेर विकास साधला आहे. दुर्गम व डोंगराळ भाग अशी ओळख असलेल्या या विभागातील या कारवट गावातील सुजाण नागरिकांनी ग्रामपंचायतीत महिलांना शंभर टक्के आरक्षण देऊन राज्यात वेगळा आदर्श घालून दिला आहे. एक आदर्श गाव म्हणून कारवट गावची नवी ओळख जिल्ह्यात निर्माण झाली आहे.