नावात काय असते, असा प्रश्न शेक्सपिअरने विचारला होता; परंतु नावातच सारे काही असते, हे आताच्या चर्चेवरून स्पष्ट होत आहे. एखाद्या शहराचे, व्यक...
नावात काय असते, असा प्रश्न शेक्सपिअरने विचारला होता; परंतु नावातच सारे काही असते, हे आताच्या चर्चेवरून स्पष्ट होत आहे. एखाद्या शहराचे, व्यक्तीचे नाव बदलल्याने फारसा फरक पडत नाही. नावाशी अस्मिता जोडलेली असते; परंतु केवळ अस्मितेने पोट भरत नसते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार आल्यानंतर अनेक शहरांची नावे बदलण्याची टूम निघाली; परंतु त्यातून काही भले झाले नाही. केवळ नावे बदलून शहरांचा विकास होत नसतो. त्यासाठी गुंतवणूक, पायाभूत सुविधा, उद्योग आदींवर भर द्यावा लागतो.
इंग्रजांच्या काळात आकरांत असलेल्या शहरांची, गावांची नावे तीन दशकांपूर्वी पुन्हा इकारांत करण्यात आली. त्रिवेंद्रमचे तिरूअनंतपूरम, बंगळूरचे बेंगळुरू, मद्रासचे चेन्नई, बडोद्याचे वडोदरा अशी अनेक नावे बदलण्यात आली. कलकत्ताचे कोलकात्ता झाले. अशी नावे कागदोपत्री बदलण्यात आली असली, तरी लोकांच्या मनातील नावे कायम आहेत. महाराष्ट्रात औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव, अहमदनगरचे अंबिकानगर असे करण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे; परंतु गेल्या 25 वर्षांत शिवसेना-भाजपची दोनदा सत्ता येऊनही त्या वेळी नामांतर करण्यात या दोन पक्षांना यश आले नाही. आता मात्र भारतीय जनता पक्ष शिवसेनेवर नामांतरावरून तुटून पडला आहे. काही नावे ही गुलामीची प्रतिके असली, तरी काही नावांना ऐतिहासिक संदर्भ असतात. ती अशी झटक्यात बदलता येत नाहीत. विकासाच्या मुद्द्यापेक्षा भावनेचे मुद्दे अधिक प्रभावी ठरतात, असे शिवसेनेला 35 वर्षे भाजपसोबत राहून चांगलेच लक्षात आलेले दिसते. त्यातही महाराष्ट्रात भाजपला सत्तेबाहेर ठेवायचे असेल, तर तीनही पक्षांना समन्वयाने काम करावे लागेल. त्यासाठी तर किमान समान कार्यक्रम आखण्यात आला आहे. भावनेपेक्षा विकास महत्त्वाचा असतो. काँग्रेसजणांनी त्यावर भर दिलाच पाहिजे; परंतु विरोधासाठी विरोध करून महाविकास आघाडीत कटुता येणार नाही, हे पाहिले पाहिजे. उस्मानाबाद, औरंगाबादची नावे मुस्लिम राज्यकर्त्यांशी संबंधित आहेत, तसेच ते अहमदनगरचेही आहे; परंतु अहमदनगरची स्थापना मलिक अहमद यांनी केली. मोगली आणि आदिलशाही या दोन्ही सत्तांपासून त्यांचे वेगळे राज्य होते. केवळ हिंदुत्वासाठी संस्थापकाला नाकारणे हा कृतघ्नपणा आहे. अहमदनगरचा व्यापार थेट बगदाद व अन्य शहरांशी होता. त्यावरून शहराचे महत्त्व लक्षात यायला हवे.
बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचे जाहीर केले होते. त्यांचा मुख्यमंत्री असतानाही ते साध्य झाले नाही. भाजप-शिवसेनेचे सरकार असतानाही ते झाले नाही. गेली 35 वर्षे औरंगाबादचे संभाजीनगर झाले नसतानाही त्या शहराचा विकास खुंटला नाही. औरंगाबादला अजून विकासाची आस आहेच. शिवसेना जरी बाळासाहेबांचे नाव घेऊन औरंगाबादचे संभाजीनगर झाले असे म्हणत असली, तरी अजून शिवसैनिक वगळता अन्य कोणीही संभाजीनगर म्हणत नाही. जनतेच्या मनात हे नाव रुजलेले नाही. शिवसेना म्हणते तसे ते जनमाणसांत रुजले असेल, तर मग नामांतराचा अट्टहास कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होतो. केवळ कागदोपत्री नाव बदलणे एवढीच औपचारिकता असेल, तर ती आता पूर्ण करण्यासाठी सत्तेची किंमत मोजण्याची शिवसेनेची तयारी आहे का, असा प्रश्न पडतो. सत्तेत सहभागी झालेले तीनही पक्ष आता सत्ता सोडायला तयार नाहीत. विवादास्पद मुद्द्यांची केवळ चर्चा करून नंतर ते मध्येच सोडून दिले जातात. शिवसेनेच्या मुखपत्रातही तसे म्हटले आहे. संभाजीनगरमुळे महाविकास आघाडीत काही बिघाडी होईल, असे कोणाला वाटत असेल तर ते ठार वेडे आहेत,’ असे स्पष्ट करतानाच शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतरणाच्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेसच्या विरोधानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपने पुन्हा महाविकास आघाडीतील अंतर्गंत वादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भाजपने केलेल्या या टीकेवर शिवसेनेने नामांतराबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. ’औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपस गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. जुनाच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी त्याचा संबंध जोडणे मूर्खपणाचे आहे,’ असे स्पष्टीकरण शिवसेनेने दिले आहे. राज्याचे महसूल मंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समितीसमोर आल्यानंतर त्याला काँग्रेसचा विरोधच असेल, हा दावा केला. यावर भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाचा घोर लागला आहे. आता शिवसेना काय करणार, असा प्रश्न चंद्रकांत पाटील व अन्य नेत्यांनी विचारला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यासाठी शिवसेना आतापर्यंत आग्रही राहिली आहे. आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने नामांतरास विरोध केल्याने शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, असा भाजपचा आग्रह होता. त्यात भूमिका स्पष्ट करण्याचसारखे काहीच नाही, असे म्हणत शिवसेनेने आपली भूमिका बदललेलीच नसल्याचे म्हटले आहे.
अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रस्ता असे नामांतर होऊ शकते, तर औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही? असा बिनतोड सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला; परंतु ते महसूलमंत्री असतानाच्या पाच वर्षांत ते का केले नाही, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे.
बाळासाहेब थोरात म्हणतात ते बरोबरच आहे. महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहेच. अन्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकर्यांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच. तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे व सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच! औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील व औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे, असा शिवसेनेचा सूर आहे. औरंगाबादच्या नामांतराचा जुना वाद पुढे आल्यानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची जुनी मागणीही शिवसेनेने पुढे आणली आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेसह हिंदुत्ववादी संघटनांकडून अहमदनगरच्या नामांतराची मागणी सुरू आहे. अर्थात त्यावरून काहींमध्ये मतभेद आहेत. काहींनी अंबिकानगर तर काहींनी आनंदनगर नाव सुचविले आहे. अंबिकानगर नाव देण्याची मागणी जुनी आहे. यावरून अनेकदा आंदोलनेही झाली आहेत. अहमदनगरला झालेल्या 70 व्या साहित्य संमेलनातही हा मुद्दा उपस्थित झाला होता. पंधराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतातील बहामनी राजवट फुटल्याने त्याचा एक भाग असलेल्या मलिक अहमद बहिरी (अहमद निजामशहा) याने स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले. त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी बिदरचा सेनापती जहांगीर खान त्याच्यावर चालून आला. अहमदनगरजवळील भिंगार येथे हे तुंबळ युद्ध झाले व त्यात जहांगीर खानचा पराभव झाल्याने या आनंदाप्रित्यर्थ भिंगारजवळच भुईकोट किल्ला उभारण्याची व त्याच्याजवळ नगर शहर वसविण्याची मुहूर्तमेढ 28 मे 1490 या दिवशी मलिक अहमदने रोवली. त्याच्या नावावरून शहराला अहमदनगर नाव देण्यात आले.