इस्लामपूर / सतीश कुंभार : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे कराड, वाळवा...
इस्लामपूर / सतीश कुंभार : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे कराड, वाळवा, कडेगाव, तसेच शिराळा तालुक्यातील विविध पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यामध्ये सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आ. मोहनराव कदम, आ. मानसिंगराव नाईक, राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांच्या भूमिका महत्वाच्या मानल्या जात आहेत.
विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, डॉ. इंद्रजीत मोहिते, माजी अध्यक्ष अविनाश मोहिते या तीन गटासोबतच मंत्री बाळासाहेब पाटील, दिवंगत माजी मंत्री विलासराव उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही कसोटी पणाला लागणार आहे.
कृष्णा मेडिकल ट्रस्टचा गौरव व नावलौकिक देशभर परिचित आहे. या ट्रस्टच्या ताकदीवर गत वेळेची कृष्णेची निवडणूकित डॉ. सुरेश भोसले यांनी सत्ता काबीज केली होती. अविनाश मोहिते यांच्या काळामध्ये कृष्णा कारखान्याच्या घोटाळ्यामुळे मोहिते यांना तुरुंगाची हवा खावी लागली. मात्र, आगामी निवडणुकीत कृष्णा ट्रस्टचा मुद्दा घेऊन अविनाश मोहिते मैदानात उतरणार आहेत. माजी अध्यक्ष दिवंगत जयवंतराव भोसले यांनी सहकारातून उभा केलेला हा ट्रस्ट खाजगी करून घेतला. त्याच वेळी संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी न्यायालयात या खाजगीकरणाला आव्हान दिले होते. मात्र, त्यामध्ये दिवंगत यशवंतराव मोहिते यांना यश आले नाही.
कृष्णा ट्रस्टचा मुद्दा घेऊन अविनाश मोहिते सभासदांना पुढे जाणार आहेत. मात्र, ते स्वतः सत्तेवर असताना कृष्णा ट्रस्टचा मुद्दा उचलून का धरला नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. आता या कृष्णेच्या निवडणूकित महाडिक गट ही आपले पॅनल उभे करणार असल्याची कृष्णा काठावर जोरदार चर्चा आहे. कृष्णेच्या निवडणूक पार्श्र्वभूमीवर डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले हे पिता-पुत्र ना. जयंत पाटील, आ. मानसिंगराव नाईक यांच्या संपर्कात आहेत. वाळवा व शिराळा तालुक्यात राजाराम उद्योग समूह व विश्वास उद्योग समूह हा सक्षमपणे कार्यरत आहेत. या परिसरातील ऊस उत्पादक कृष्णा कारखान्याचे सभासद आहेत. त्यामुळे डॉ. भोसले यांनी वाळवा, शिराळा तालुक्यात राष्ट्रवादीला जवळ करून जयंत पाटील यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भोसले गटाकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे
जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष
डॉ. सुरेश भोसले भाजपमध्ये असले तरी त्यांच्या संचालक मंडळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संचालक आहेत. त्यात जयंत पाटील यांचे समर्थक आहेत. त्यांच्या विरोधात डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते कॉंग्रेस राष्ट्रवादीची ताकद घेऊन एकत्रित लढणार आहेत. त्यांना दक्षिण कराडमधून आ. पृथ्वीराज चव्हाण, कडेगावमधून डॉ. विश्वजीत कदम यांची साथ आहे. ना. जयंत पाटील यांनी कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. मात्र, या रणांगणात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे