सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरातील बहुचर्चित ग्रेडसेपरेटरच्या एका भुयारी मार्गिकेवरील श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव असणारा फलक फा...
सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरातील बहुचर्चित ग्रेडसेपरेटरच्या एका भुयारी मार्गिकेवरील श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव असणारा फलक फाटल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सातारा शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणा करून हा फलक फाडला असल्याची सुरू झाल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले होते. मात्र, पोलिसांनी तो फलक ताब्यात घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता हा फलक नैसर्गिकरीत्या फाटून खाली पडल्याचे शनिवारी सायंकाळी स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
घटनेचे गांभिर्य ओळखून घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे व इतर वरिष्ठांनी फलकाची, तसेच परिसराची पाहणी करत उपस्थितांना शांततेचे आवाहन केले. या वेळी साविआच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत फलक फाडणार्या प्रवृत्तीचा निषेध केला. पोलिसांनी साविआच्या नेत्यांशी चर्चा करत तो फलक ताब्यात घेत परिसरातील बंदोबस्त वाढवला होता.
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी वरिष्ठ अधिकार्यांकडून माहिती घेत तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी ताब्यातील फलकाची तसेच मार्गिकेच्या परिसरातील फुटेजची पाहणी केली. फुटेजच्या पाहणीत हा फलक नैसर्गिकरीत्या फाटून खाली पडल्याचे दिसून आले. याबाबतचे पत्रक पोलिस अधीक्षक कार्यालयाने सायंकाळी प्रसिध्दीला दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.