वडूज / प्रतिनिधी : डांभेवाडी, ता. खटाव येथील विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर या महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी...
वडूज / प्रतिनिधी : डांभेवाडी, ता. खटाव येथील विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर या महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत विवाहित महिलेचा पती विशाल लालासो बागल, सासू सौ. छबुताई लालासो बागल, सासरे लालासो विश्वनाथ बागल (रा. डांभेवाडी) या तिघांविरोधात वडूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत लाला गोविंद शिंदे (रा. भालवडी, ता. माण) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहीती अशी, डांभेवाडी, ता. खटाव येथील विवाहित महिला सारिका विशाल बागल (वय 29) हिने शुक्रवार, दि.22 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत सौ. सारिका यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे याठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, मुलगी सारिका हिचे पती विशाल बागल, सासू छबुताई बागल, सासरे लालासो बागल (रा. डांभेवाडी) यांनी संगनमत करून सारिका हिस घरातील कामे नीट येत नाहीत, तुला मूले सांभाळने होत नाहीत, असे म्हणून टोचून बोलून शिवीगाळ करत होते. तिला कष्टाची कामे करण्यास सांगून उपाशी पोटी ठेवून शिवीगाळ, मारहाण करून, माहेरवरून शेतीसाठी पैसे घेऊन ये असे म्हणून जाचहाट छळ केला. या त्रासाला कंटाळून मुलगी सारिका हिने गळफास घेऊन आत्महत्याक केली असल्याची तक्रार विवाहितेच्या वडिलांनी वडूज पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत केली होती. याप्रकरणी पती विशाल, सासू छबुताई यांना वडूज पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर करत आहेत.