कल्याण/प्रतिनिधीः शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 78 एकर जमीन ईडीने जप्त केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. टिटवाळ्य...
कल्याण/प्रतिनिधीः शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 78 एकर जमीन ईडीने जप्त केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. टिटवाळ्याच्या गुरुवली येथे सरनाईक यांची शंभर कोटी रुपये किमतीची ही जमीन असल्याचे त्यांनी सांगितले. सोमय्या हे आज टिटवाळ्यातील गुरवली गावात आले होते. या वेळी त्यांनी विहंग आस्था हौसिंग कंपनीच्या जागांची पाहणी केली.
सरनाईक आणि मोहित अग्रवाल यांनी एनएसईएल घोटाळ्याचे शंभर कोटी रुपये विहंग आस्था हौसिंग कंपनीत वळवले होते. त्यातून गुरवली येथे 112 एकर जमिनी विकत घेण्यात आल्या होत्या. त्यातील 78.27 एकर जमिनीचा कालच ईडीने ताबा घेतला आहे. तसेच या जागेवर ईडीने आपले बोर्डही लावले असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. घोटाळ्यातील शंभर कोटीची रक्कम परत न केल्यास अन्य मालमत्ताही जप्त केली जाईल, असा इशारा ईडीने सरनाईक यांना दिल्याचा दावा सोमय्या यांनी केला पीएमएलए कायद्यातर्गत या जमिनींचा कब्जा ईडी, मुंबईने घेतला आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रींग अॅक्ट 2002 च्या अंतर्गत या जमिनींचा ताबा अधिकृतरित्या घेण्यात आला आहे. या जमिनींवर अतिक्रमण करण्यास बंदी आहे. या जमिनी संबंधी कोणीही कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करण्यात येऊ नये, असे या बोर्डावर ईडीने लिहिले असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.