पुणे/प्रतिनिधी. नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नॉन-बँकिंग वित्तीय सेवा देणारी कंपनी बजाज फायनान्सवर रिझर्व्ह बँकेने अडीच कोटी रुपयांचा...
पुणे/प्रतिनिधी. नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नॉन-बँकिंग वित्तीय सेवा देणारी कंपनी बजाज फायनान्सवर रिझर्व्ह बँकेने अडीच कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे, की कंपनीबाबत ग्राहकांकडून रिकव्हरी आणि कलेक्शनसाठी चुकीच्या पद्धतींचा वापर केल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या. इतकेच नाही तर कंपनीच्या विरोधातही फेअर प्रॅक्टिस कोडचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. अशा परिस्थितीत नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीला हा दंड लावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहितेच्या सूचनांचे बजाज फायनान्स, पुणे यांच्याकडून उल्लंघन झाल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. या व्यतिरिक्त, कंपनीने सर्व एनबीएफसींसाठी लागू केलेल्या फेअर प्रॅक्टिस कोडकडेदेखील दुर्लक्ष केले. रिझर्व्ह बँक अधिनियम, 1934 अंतर्गत ही कारवाई केली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, कंपनी हे सुनिश्चित करू शकली नाही, की त्यांच्या रिकव्हरी एजंटकडून वसुलीवेळी ग्राहकांना त्रास सहन करावा लागला नाही. रिझर्व्ह बँकेने हा दंड आकारण्यापूर्वी बजाज फायनान्सला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. नियमांचे उल्लंघन झाल्यास कंपनीवर दंड का आकारला जाऊ नये, अशी विचारणा या नोटीसमधून करण्यात आली होती. यास उत्तर दिल्यानंतर रिझर्व्ह बँकेने कंपनीला दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेने सांगितले, की ही कारवाई नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे. तसेच या कारवाईचा कंपनीने ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारावर किंवा कराराच्या वैधतेवर शंका घेण्याचा कोणताही हेतू नाही, असेही म्हटले आहे.