राजकीय नेत्यांच्या चारित्र्याबद्दल अनेकदा चर्चा होत असते. ती किती खरी, किती खोटी हा संशोधनाचा भाग असला, तरी राजकीय नेत्यांनी अनेकदा दुसरी अं...
राजकीय नेत्यांच्या चारित्र्याबद्दल अनेकदा चर्चा होत असते. ती किती खरी, किती खोटी हा संशोधनाचा भाग असला, तरी राजकीय नेत्यांनी अनेकदा दुसरी अंगवस्त्रं बाळगलेली असतात, हे जगजाहीर आहे. नारायण दत्त तिवारीचं प्रकरण फारच गाजलं होतं. त्यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचं दुसर् या लग्नाचं प्रकरण गाजलं. आता महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित बलात्काराच्या आरोपानंतर त्यांच्या दुसर्या लग्नाची गोष्ट समाजाला पहिल्यांदाच बाहेर आली. दुसर्या लग्नाची ही तिसरी गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुंडे यांना त्रासदायक ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुरोगामी आहेत. त्यांनी महिलांच्या सन्मानाचे अनेक निर्णय घेतले. त्यांना आरक्षण दिलं. पहिलं महिला धोरण आणलं. त्याच पवार यांच्या पक्षातील दोन नेत्यांवर 15 दिवसांच्या अंतरानं बलात्काराचे गंभीर आरोप व्हावेत, यावरून आता पवार यांनाच काही तरी करण्याची आवश्यकता आहे. त्यातही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाविरोधात झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात तथ्य नसल्याचं पोलिस सांगत असलं, तरी संबंधित तरुणी त्यानंतर कुठं गायब झाली, ती गेल्या काही दिवसांत का सापडत नाही, या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी सुचविल्याप्रमाणं या प्रकरणाच्या चौकशीसाठी महिला पोलिस अधिकार्याची नियुक्ती करायला हवी. त्यामुळं संशयाचं जाळं फिटण्यास मदत झाली असती. महेबूब शेख यांच्या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेस सावरत नाही, तोच आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार करण्यात आली आहे. सातार्यात सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार दाखल करणार्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयानं दिल्यानंतर दुसर्याच दिवशी मुंडे यांचं प्रकरण बाहेर आलं. दोषी असणार्यांना पाठिशी घालणार नाही आणि निर्दोष असणार्यांचे बळी घेतले जाणार नाही, हे त्यांनीच आता ठरवायला हवं. राजकीय नेते आणि त्यांचं दुसरं अंगवस्त्र ही प्रकरणं फारच गाजली. काहींची चर्चा झाली, काहींची सर्वांना माहिती असूनही दुर्लक्षित राहिली. द्विभार्या प्रतिबंधक कायदा असूनही एकच तरुण एकाच वेळी दोन युवतींशी एकाच मंडपात राजरोस विवाहबद्ध होत असताना कायद्याची रक्षक असलेली मंडळी त्याकडं डोळेझाक करतात. राजकीय नेत्यांच्या अशा प्रकाराकडं तर मग ढुंकूनही पाहिलं जाणार नाही, हे ओघानं आलंचय बलात्कार पीडितांची नावं उघड होऊ नयेत, असं सर्वोच्च न्यायालयानं बजावलं आहे; परंतु पीडित महिलाच समाज माध्यमांचा वापर करून आपली जगभर ओळख करून देत असेल, तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाही काही अर्थ राहत नाही. मध्यंतरी ’मी टू’ मोहीम राबविली गेली. त्यात अनेक महिलांनी आपली ओळख जाहीर करीत आपल्यावर कसे लैंगिक अत्याचार झाले, हे सांगितलं; परंतु त्यात सेलिब्रिटींची आरोपी म्हणून नावं फारशी आली नव्हती. आता तक्रार दाखल करणार्या महिलेला त्या मोहिमेच्या काळात किंवा नंतरही तक्रार दाखल करता आली असती; परंतु तिनं ती केली नाही. एकदा नव्हे, तर अनेकदा अत्याचार होऊनही महिला गप्प बसत असेल, तर मग अत्याचार करणार्याइतकाच दोष संबंधित महिलेचा असतो. त्याचं कारण गप्प बसल्यानं संबंधिताची भीड चेपते आणि तो वारंवार तसं करायला प्रवृत्त होतो. बॉलिवूडमध्ये काम करणार्या एखादीनं तिच्यावर झालेल्या बलात्काराची तक्रार थेट 14 वर्षांनी केली असेल, तर त्यात संशयाला जागा राहते. संबंधित महिलेच्या बहिणीचा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यांशी प्रेमविवाह झाला आहे. हा विवाहही बेकायदेशीरच आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार पहिली पत्नी असताना दुसरा विवाह करता येत नाही, अगदी पहिल्या पत्नीची मान्यता असली तरीही. असं असताना द्विभार्या प्रतिबंधक कायद्यानुसार खरंतर सर्वावरच गुन्हा दाखल व्हायला हवा. बॉलिवूडमध्ये काम करणारी महिला नक्कीच सामान्य नाही. तिच्या म्हणण्यानुसार, धनंजय मुंडे तिच्या बहिणीच्या बाळंतपणाच्या काळात इंदूरला आलं असताना त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. तेव्हा मुंडे मंत्री नव्हते. विरोधी पक्ष नेतेही नव्हते. त्यामुळं त्याच वेळी तिनं तक्रार केली असती, तर तिच्यावर दबाव यायचंही काहीच कारण नव्हतं. इंदूर पोलिसांना मुंडे कोण आहेत, हे माहीत असण्याचंही काही कारण नव्हतं. बलात्कारासारख्या गंभीर घटनेची पोलिसांनी तक्रार दाखल करायला हवी होती. भलेही महेबूब शेख यांच्याप्रकरणात जसं पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं, तसं देता आलं असतं. ओशिवरा पोलिसांनी मुंडे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर संबंधित महिलेनं पोलिस आयुक्तांच्या नावे एक पत्र लिहिलं असून त्याची प्रत राज्यपालांनाही पाठवली आहे. या पत्रात त्यांनी मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुंडे यांनी लग्नाचं आमिष दाखवून माझी फसवणूक केली. माझ्यावर बलात्कार करून माझं शारीरिक शोषण केलं. त्यामुळं मला त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा आहे, असं म्हटलं आहे. मुळात मुंडे यांचा एक विवाह झाला आहे. त्याच वेळी तक्रारदार महिलेच्या बहिणीशीही त्यांचा दुसरा विवाह झाला आहे. अशा परिस्थितीत मुंडे यांनी समजा लग्नाचं आमिष दाखविलं असेल, तर संबंधित महिलेनं त्याला बळी पडायला नको होतं. म्हणजे संबंधित महिला आपल्याच बहिणीचं घर उद्ध्वस्त करायला निघाली होती, असा त्याचा अर्थ होतो. तक्रारदार महिलेच्या बहिणीशी मुंडे यांचा 1998 मध्येच विवाह झाला असताना सहा वर्षांनी लग्नाच्या आमिषानं तिच्यावर मुंडे बलात्कार करतात आणि त्यानंतर 16 वर्षे ती महिला शांत राहते. म्हणजे एकूण 22 वर्षांच्या या काळात अनेक गुपितं दडली आहेत. त्यातही तक्रारदार महिलेला झालेली मुलं मुंडे यांच्याच घरात राहतात. मुंडे यांचं नाव त्यांनी पालक म्हणून लावलं आहे. तक्रारदार महिलेच्या बहिणीला मुंबईत सदनिका घेऊन देण्यास मदत केली. असं असेल, तर तक्रारदार महिला, तिचा भाऊ आणि बहीण मुंडे यांच्या विरोधात बदनामीच्या धमक्या देऊन खंडणी मागण्याच्या आरोपाला पुष्टी मिळते. मुंडे यांनी म्हटल्याप्रमाणं न्यायालयात याचिका दाखल असताना तिथंच या आरोपाची माहिती दिली असती, तर अधिक चांगलं झालं असतं; परंतु तसं न करता पैशाची मागणी करायची आणि ते दिले नाहीत, की कोणत्याही स्तराला जायचं, असे प्रकार सध्या सुरू आहेत. त्यातलाच हा प्रकार आहे. खरंतर मुंडे आणि संबंधित महिलेचं प्रकरण हे वैयक्तिक असलं, तरी मुंडे हे सामाजिक न्यायमंत्री असल्यानं त्यांनी स्वतः काही काळ मंत्रिपदाचा त्याग करून सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचं आव्हान स्वीकारायला हवं. पवार यांनी त्यांना तसं करायला भाग पाडलं पाहिजे. काही काळ मंत्रिपदावर नसले, म्हणजे जग इकडचं तिकडं होत नाही; परंतु कलंक धुवून काढण्यासाठी ते आवश्यक आहे. तुला गायिका बनायचं असेल, तर मी तुला बॉलिवूडच्या मोठमोठ्या दिग्दर्शक निर्मांत्याशी भेटवेन. तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन. या नावाखाली मुंडे यांनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवला, असं या तक्रारीत म्हटलं आहे. संघर्ष, अमोघ वक्तृत्व आणि कुशल संघटन कौशल्याच्या बळावर धनंजय यांनी राजकारणात स्वत:ची स्पेस निर्माण केली आहे. त्यांच्या राजकारणाला आता कुठं खर्या अर्थानं बहर आलेला असतानाच त्यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानं खळबळ उडाली आहे. या आरोपामुळं मुंडे अडचणीत आले आहेत. मुंडे 1995पासून राजकारणात आहेत. या आरोपांमुळं त्यांच्या 25 वर्षाच्या राजकारणाला ग्रहण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकारणात अनेक चढउतार पाहिल्यानंतर एवढा मोठा आरोप झाल्यानं मुंडे यांच्या राजकारणाचं काय होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत शालीन आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यामुळं ते मुंडे यांच्यावर कारवाई करणार का, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंडे आणि ठाकरे घराण्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळं मुंडे यांच्यावर कारवाई करताना मुख्यमंत्र्यांना हे संबंध आडवे येतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. उद्या त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची वेळ आली, तर पवार त्याला संमती देतील का, याबाबत काहीही सांगता येत नसल्याचं राजकीय जाणकार सांगतात. मुंडे यांच्यावर सरकारनं कारवाई केली नाही किंवा त्यांचा पक्षाकडून बचाव करण्यात आला तरी मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला घरघर लागू शकते, असं जाणकार सांगतात. प्रत्येक निवडणुकीत मतदारांसमोर जाताना हे प्रकरण चर्चिलं जाईल आणि विरोधकांकडून त्याचा हत्यार म्हणून वापर केला जाईल. त्यामुळं मानहानीला सामोरे जायचं की राजकारणात राहायचं, या दोन पर्यांयापैकी एका पर्यायाचा मुंडे यांना स्वीकार करावा लागेल, असं जाणकार सांगत आहेत.