जळगाव : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जळगाव जिल्ह्य...
जळगाव : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील धारागीर ग्रामपंचायतीची निवडणूक पुन्हा एकदा बिनविरोध पार पडली आहे. गेल्या 50 वर्षांपासून येथील ग्रामपंचायत बिनविरोध होत असून, ग्रामस्थांनी इतिहासच रचला आहे. माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांच्या प्रयत्नातून 1970 पासून धारागीर गावात ग्रामपंचायतीसाठी मतदान झालेले नाही. धारागीरवासीयांनी ग्रामपंचायत बिनविरोधचे अर्धशतक पूर्ण करत राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोल शहरापासून जवळच धारागीर हे गाव वसलेले आहे. सुमारे 1300 लोकसंख्येच्या या गावात 1970 पासून ग्रामपंचायतीसाठी मतदान झालेले नाही. प्रत्येक पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडत आहे. गावातील परस्परातील एकोपा आणि सलोखा टिकून रहावा, गावाच्या विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची संकल्पना मांडली. ही परंपरा आज 50 वर्षे उलटूनही अबाधित आहे, हे विशेष.