सातारा/प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यासह सांगली गुरुवारी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावत द्राक्षाच्या पिकांसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्र...
सातारा/प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यासह सांगली गुरुवारी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावत द्राक्षाच्या पिकांसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुसर्या दिवशीही ढगाळ वातावरण असल्याने द्राक्ष बागायतदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गत दोन दिवसापासूल अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, काल दुपारी व रात्री जोरदार अवकाळी पाऊस झाला. यापावसाने शेतातील ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. तर सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड, खटाव, सातारा, महाबळेश्वर, वाई कोरेगाव तालुक्यातही पावसाचा शिडकाव झाला. सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगांव, खानापूरसह शिराळा तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तसेच दुसर्या दिवशीही ढगाळ वातावरण व हलका पावसामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. जोरदार वार्यांसह पडलेल्या पावसामुळे पिके कोलमडली आहेत. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा तालुक्याचा रब्बी हंगाम प्रमुख असल्याने या तालुक्यात पेरणीही मोठ्या प्रमाणात झाली होती. पिकांची अवस्था चांगली असताना पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान होणार आहे. या ढगाळ वातावरणाचा परिणाम प्रमुख पिकांवर होत असून शेतकर्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अवकाळी पावसाचा व प्रतिकूल वातावरणाचा द्राक्ष पिकास फटका बसला आहे. द्राक्षांवर भुरी, घडकुज, दावण्या आदी रोगांचा प्रादुर्भावाची भिती निर्माण झाल्याने फवारणीकडे शेतकर्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. खटाव तालुक्यातील कलेढोण, मायणी, तरसवाडी, पाचवड, गारळेवाडी, मुळीकवाडी, हिवरवाडी, विखळे, शिंदेवाडी (कलेढोण), कानकात्रे, अनफळे उत्तर कोरेगाव परिसरातील बहुतांशी शेतकरी निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. गेल्या काही दिवसांपासून या शेतकर्यांना अवकाळी पाऊस, सातत्याने बदलणारे हवामान, ढगाळ वातावरण, धुके, कडाक्याची थंडी यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. अवकाळी पावसामुळे आंबा, स्ट्रॉबेरीसह द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.