नवीदिल्लीः काँग्रसेच्या अध्यक्षपदाबाबत जून महिन्यात निर्णय घेण्याचे ठरले आहे. पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर अध्यक्षपदाबाबत अंतिम न...
नवीदिल्लीः काँग्रसेच्या अध्यक्षपदाबाबत जून महिन्यात निर्णय घेण्याचे ठरले आहे. पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय घेण्यावर काँग्रेसच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले; मात्र राहुल गांधींसमोर पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत दोन गटांमध्ये खडाजंगी झाली. या वेळी राहुल यांनी सर्व काही संपवा आणि आता पुढचा विचार करा, असे सांगितले. जून 2021 मध्ये काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल अशी
माहिती के. सी. वेगणुगोपाल यांनी कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. बैठकीत वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकूल वासनिक आणि पी. चिदंबरम यांनी तात्काळ संस्थात्मक मतदान केले जावं अशी मागणी केली. निवडणुकांमधील पराभवानंतर या नेत्यांनी पक्षनेतृत्व आणि व्यवस्थापनासंबंधी अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित केले होते, त्यावरुन गदारोळ निर्माण झाला होता. दुसरीकडे गांधी कुटुंबाचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे अशोक गेहलोत, अमरिंदर सिंग, ए. के. अँटनी, तारिक अन्वर यांनी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू यांच्यासहित पाच राज्यांमधील निवडणुका झाल्यानंतर अध्यक्षपदाबाबत निर्णय घेतला जावा अशी भूमिका मांडली. गेहलोत यांनी तर पक्षांतर्गत विरोधकांवर टीका करताना सोनिया गांधी यांच्यावर विश्वास नाही का, अशी विचारणा केली. या वेळी एका नेत्याने म्हटले, की आपण नेमक्या कोणाच्या अजेंड्यासाठी काम करत आहोत? भाजप आपल्याप्रमाणे अंतर्गत राजकारणावर चर्चा करत नाही? त्यांची प्राथमिकता आधी राज्यांच्या निवडणुका आणि नंतर संस्थात्मक निवडणुका असतात.
अखेर दुसर्या गटाने माघार घेतली.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणा सोनिया करणार आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 1997 मध्ये अखेरची निवडणूक झाली होती. राहुल यांनी अध्यक्षपदावरून माघार घेतल्यानंतर 2019 मध्ये सोनिया यांच्याकडे पुन्हा सूत्रे सोपवण्यात आली होती. निवडणुकीतील पराभवामुळे राहुल यांनी हा निर्णय घेतला होता. दुसरीकडे सोनिया यांनीही आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. राहुल अध्यक्षपद न स्वीकारण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. सोबतच गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे ही जबाबदारी द्यावी, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांनी ऑगस्ट महिन्यात पक्षनेतृत्वावरून प्रश्न विचारले होते. काँग्रेसमधील 23 वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्षाला उभारी देण्यासंदर्भात पत्र लिहिले होते. काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीसह पक्षामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेरबदल करण्याची मागणीही या नेत्यांनी केली होती. या पत्रावर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री व खासदार आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, विवेक तन्खा, कार्यकारी समितीचे सदस्य मुकुल वासनिक, जितीन प्रसाद, माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा, राजेंद्र कौर भट्टल, एम. वीरप्पा मोईली, पृथ्वीराज भवन, पी. जे कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी, मिलिंद देवरा, काँग्रेसचे नेते राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह ठाकूर, अखिलेश प्रसाद, हरयाणा विधानसभेचे माजी सभापती कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री आणि संदीप दीक्षित यांच्या स्वाक्षर्या होत्या.