नवी दिल्ली : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाच्या आगीत अतिदक्षता विभागात ठेवलेल्या 10 नवजात बालकांचा मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 ल...
नवी दिल्ली : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाच्या आगीत अतिदक्षता विभागात ठेवलेल्या 10 नवजात बालकांचा मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच, या आगीत जी बालकं गंभीर जखमी झाली आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याचीही घोषणा केंद्राने केलीये. ही मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून करण्यात येईल.
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 9 जानेवारीला आग लागली होती. यावेळी रुग्णालयात धूर जमा झाल्यामुळे अतिदक्षता विभागात ठेवलेल्या तब्बल 10 बालकांचा होरपळून आणि गुदमरुन मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली गेली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित देशमुख यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत, कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं सागितलं होतं. त्यांनतर आता केंद्र सरकारने या आगीत ज्या बालकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये देण्याचे केंद्राने जाहीर केले आहे. तसेच, या आगीत गंभीर जखमी झालेल्या बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.