नवी दिल्ली : प्रद्रीघ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत भारताच्या महत्वाकांक्षी तसेच जगातील सगळ्यात मोठ्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित देशव्याप...
नवी दिल्ली : प्रद्रीघ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत भारताच्या महत्वाकांक्षी तसेच जगातील सगळ्यात मोठ्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित देशव्यापी कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी सकाळी दृक-श्राव्य माध्यमाद्वारे शुभारंभ केला. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 3006 लसीकरण केंद्र डिजिटल पद्धतीने जोडली गेली.देशाच्या कानाकोप-यापर्यंत व्याप्ती असलेला हा जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम ठरणार आहे.
पहिल्या दिवशी प्रत्येक ठिकाणी सुमारे 100 लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाईल.हा लसीकरण कार्यक्रम लसीकरण करण्याच्या प्राधान्य गटांच्या तत्त्वांवर आधारित आहे आणि आयसीडीएस कामगारांसह सरकारी आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना या टप्प्यात ही लस मिळेल. शुक्रवारी देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेच्या सज्जतेचा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आढावा घेतला होता. यासोबत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्माण भवन इमारतीत उभारण्यात आलेल्या समर्पित कोरोना नियंत्रण कक्षाला त्यांनी भेट दिली.
कोविड नियंत्रण कक्षाला दिलेल्या भेटी दरम्यान डॉ हर्ष वर्धन यांनी को - विन या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विकसित केलेल्या डिजिटल प्रणालीच्या प्रत्येक पैलूची बारकाईने पाहणी केली. देशातल्या कोरोना लसीकरणासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. लसीचा साठा, साठवणुकीसाठीचे तापमान आणि कोरोना लसीच्या लाभार्थ्यांची लसी संदर्भातली माहिती याद्वारे ठेवता येणार आहे. लसीकरणासाठी देशभरातल्या राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावर कार्यक्रम व्यवस्थापकांना हा डिजिटल प्रणाली सहाय्य करणार आहे. लाभार्थी, आखण्यात आलेली सत्रे, घेण्यात आलेली सत्रे इत्यादीची माहिती ठेवण्यासाठी याद्वारे मदत होणार आहे. 3 जानेवारीला भारताच्या औषध नियंत्रक महासंचालायाने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन स्वदेशी लसींना अत्यावश्यक आणि आपतकालीन परिस्थितीत सीमित वापरासाठी मंजुरी दिली. सीरम इंस्टीट्यू ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक द्वारा निर्मिती कोरोना लसीचा यात समावेश आहे.
आरोग्य कर्मचा-यांना आणि प्रत्यक्ष आघाडीवर कार्यरत असणा-या कोरोना योध्यांना प्राधान्याने दोन भागात लसीकरण करण्यात येणार आहे, साधारणपणे ही संख्या 3 कोटी आहे. त्या खालोखाल 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षाखालील काही इतर आजार असलेल्या व्यक्तींना लसीकरण केले जाईल. ही संख्या अंदाजे 27 कोटी आहे.
लसीकरणाचा साठा, त्यांच्या साठवणुकीचे तापमान आणि कोरोनाची लस घेणा-या नागरिकांचा वैयक्तिक पाठपुरावा अशी सर्व माहिती विशेष डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुरविली जाणार आहे. ही डिजिटल व्यवस्था पूर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांचे स्वयंचलित सत्र वाटप, त्यांची पडताळणी आणि लसीचे वेळापत्रक यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर डिजिटल प्रमाणपत्र तयार करण्यासाठी सर्व स्तरातील कार्यक्रम व्यवस्थापकांना मदत करणार आहे. या डिजिटल यंत्रणेत 79 लक्ष लाभार्थ्यांपेक्षा अधिक जणांनी यापूर्वीच नोंद केली आहे.
लसीकरण कार्यक्रमात को-विन हा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेला एक डिजिटल माध्यमाचा वापर केला जाईल. लसीचा साठा, साठवणूक करण्यासाठी आवश्यक तापमान याबाबत वास्तविक माहिती आणि कोरोनालसीसाठी लाभार्थींचा वैयक्तिकरित्या मागोवा घेण्यास मदत होईल. हा डिजिटल कार्यक्रम लसीकरण सत्र आयोजित करताना सर्व स्तरातील कार्यक्रम व्यवस्थापकांना मदत करेल.
कोरोना लसीकरण सुरुवात आणि को-विन सॉफ्टवेअरशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक समर्पित 24x7 संपर्क केंद्र - 1075 - देखील स्थापन करण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सक्रिय सहकार्याने कोव्हीशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींच्या पुरेशा मात्रा यापूर्वीच देशभरातील सर्व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आल्या आहेत. राज्य- केंद्रशासित प्रदेश सरकारने जिल्ह्यांपर्यंत पोहचवल्या आहेत. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली देशभरातील कोरोनाच्या सद्यस्थितीबरोबरच लसीकरणाबाबत राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातील तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि अन्य संबंधित वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. 16 जानेवारीपासून सुरु होणा-या राष्ट्रव्यापी कोरोना लसीकरण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी दृक-श्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला तसेच संबंधीत राज्यातील कोरोना परिस्थिती आणि आरोग्य व्यवस्थांचा आढावा घेतला.