इस्लामपूर / प्रतिनिधी : पेठ (ता. वाळवा) येथील श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रगती ग...
इस्लामपूर / प्रतिनिधी : पेठ (ता. वाळवा) येथील श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रगती गौरवास्पद असून संस्थेच्या दशकपूर्तीच्या प्रवासात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मिळवलेले यश उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही. आर. शास्त्री यांनी केले.

श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या सदिच्छा भेटीच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव राहूलदादा महाडिक यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. शास्त्री यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. डॉ. महेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. शास्त्री म्हणाले, अभियांत्रिकी शिक्षणात विविध आमूलाग्र बदलांसह नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सुसंगत असा या विद्यापीठाचा अभ्यासक्रम असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा बरोबरच कौशल्यावर आधारित उपक्रमांवर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना नोकरीच्या विविध संधींसह ’स्टार्टअप’ सारख्या उद्योग निर्मितीलाही सक्षम करणे हा या विद्यापीठाचा उद्देश आहे. नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालया अंतर्गत गुणवत्तापूर्ण तंत्र शिक्षणाबरोबरच राबवल्या जाणार्या उपक्रमांविषयी समाधान व्यक्त करत या क्षेत्रात कार्यरत असणार्या राज्यातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये एक अग्रेसर महाविद्यालय म्हणून या विद्यापीठाअंतर्गत समावेश होणार असल्याची घोषणा कुलगुरू डॉ. शास्त्री यांनी केली. कुलगुरु डॉ. शास्त्री यांनी उपस्थितांशी संवाद साधला. राहुल महाडिक म्हणाले, तंत्रशिक्षणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची भूमिका महत्त्वपूर्ण असून शैक्षणिक संस्थांच्या प्रगतीसाठी कुलगुरू शास्त्री यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. डॉ. महेश जोशी यांनी संकुलाच्या विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणार्या उपक्रमांचा तसेच यशस्वी दशकपूर्तीचा लेखाजोखा मांडला. प्रा. दत्तात्रय पाटील यांनी महाविद्यालयाअंतर्गत राबवल्या जाणार्या विविध उपक्रमांची माहिती सादर केली. प्रा. प्रितल पाटील यांनी अतिथींचा परिचय करून दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. ए. मिरजे यांनी प्रास्ताविक केले प्रा. मंगेश इंगवले यांनी आभार मानले.