सातारा/प्रतिनिधी : सातारा शहराजवळ असणार्या समर्थनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, त्या प्रक्रियेस काहींनी हकरत घेतल...
सातारा/प्रतिनिधी : सातारा शहराजवळ असणार्या समर्थनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, त्या प्रक्रियेस काहींनी हकरत घेतली आहे. याबाबतचे पत्रक सुनील शिवराम माने (रा. माने कॉलनी, देगाव रोड) यांनी दिले आहे. यात त्यांनी समर्थनगरला महसुली गावाचा दर्जा नसल्याचे नमूद करत निवडणुकीवर आक्षेप घेतला आहे. गावच अस्तित्वात नसताना निवडणूकीचा घाट घालून सरकारी कागदावरचे घोडे नाचू लागल्याने जनतेमध्ये उलट-सुलट चर्चा सुरु आहे.
सातारा शहरानजीकच्या कोडोली या गावाचे विभाजन करून सन 2000 मध्ये समर्थनगर ग्रामपंचायतीची स्थापना झाली. या वेळी ग्रामपंचायतीच्या अखत्यतारित काही गट नंबर देण्यात आले होते. यानतंर काही वर्षांनी संभाजीनगर, विलासपूर ग्रामपंचायतींची निर्मिती झाली. या वेळी समर्थनगरमधील गट नंबर विभागून या दोन्ही ग्रामपंचायतींना देण्यात आले.
समर्थनगरचे गट नंबर विभागून दिल्याने त्यांच्या हद्दीत स्वत:चे गट नंबर शिल्लक नाहीत. गट नंबर नसल्याने समर्थनगरचे महसुली गावाचे अस्तित्व संपुष्टात आल्याचा आरोप माने यांनी पत्रकात केला आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, योग्य ती कार्यवाही झाली नाही. समर्थनगरचे दप्तर दुरुस्त झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नये, असा अर्ज केला असतानाही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. याबाबतच्या हरकती त्या वेळी लक्षात घेण्यात आल्या नाहीत. महसुली गाव अस्तित्वात नसताना याठिकाणी दोन पंचवार्षिक निवडणुका घेण्यात आल्या. या गोंधळास प्रशासनाच्या चुका कारणीभूत असल्याचा आरोप माने यांनी पत्रकात केला आहे.