फलटण / प्रतिनिधी : फलटण-पुणे मार्गावर लवकरच प्रवासी व माल वाहतूक सुरु करण्याची ग्वाही देत फलटण-बारामती रेल्वे मार्गाच्या पुर्ततेबाबत असलेल्य...
फलटण / प्रतिनिधी : फलटण-पुणे मार्गावर लवकरच प्रवासी व माल वाहतूक सुरु करण्याची ग्वाही देत फलटण-बारामती रेल्वे मार्गाच्या पुर्ततेबाबत असलेल्या अडचणी समजावून घेऊन, त्या दूर करण्याच्या आणि या मार्गाचे कामही तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्वरित निर्णय घेण्याची मागणी सोलापूर विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली आहे.
फलटण-लोणंद-बारामती रेल्वे मार्गाचे प्रलंबीत काम पूर्ण करण्यात असलेल्या अडचणीबाबत माहिती घेऊन त्यादूर करण्यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकार्यांच्या उपस्थितीत येथील तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर बोलत होते. यावेळी रेल्वे पुणे विभाग व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा, सहाय्यक व्यवस्थापक जे. सी. गुप्ता, सहाय्यक व्यवस्थापक योगेंद्रसिंह बैस, प्रांताधिकारी फलटण डॉ. शिवाजीराव जगताप, प्रांताधिकारी बारामती दादासाहेब कांबळे, प्रांताधिकारी कोरेगाव श्रीमती ज्योती पाटील, तहसीलदार फलटण समीर यादव, रेल्वेचे अधिकारी जी. श्रीनिवास, राजेंद्र कुलकर्णी, सतीश कोंडलकर, मुख्य नियंत्रक एम. के. सिंबीयन, मनोरंजन कुमार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, सर्फराज बागवान, पिंटू ईवरे, अभिजीत नाईक निंबाळकर, सुरवडी सरपंच जितेंद्र साळुंखे पाटील, सुनील यादव उपस्थित होते.
फलटण-बारामती रेल्वे मार्गासाठी खाजगी वाटाघाटीने मार्ग निघण्यात अडचणी येत असतील, अडचणी निर्माण होत असतील, नाहक वेळ वाया जाणार असेल तर सदर जमिनी सक्तीने भूसंपादन करुन ताब्यात घेऊन रेल्वे मार्गाचे प्रलंबीत काम त्वरित सुरु करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधीत अधिकार्यांना देताना भूसंपादना शिवाय अन्य अडचणी आहेत काय अशी विचारणा खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी अधिकार्यांकडे केली.
फलटण-बारामती रेल्वे मार्ग 37 कि. मी. लांबीचा असून त्यामध्ये बारामती तालुक्यातील 13 व फलटण तालुक्यातील 3 गावातील जमिनींचे भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादन प्रक्रियेसाठी बारामती तालुक्याला 115 कोटी व फलटण तालुक्याला 15 कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्याचे यावेळी पुणे विभागीय व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा यांनी निदर्शनास आणून दिले. फलटण-लोणंद रेल्वे मार्गाचे भूसंपादन करताना काही शेतकर्यांचे केवळ 1 ते 3 गुंठे क्षेत्र शिल्लक रहात असून ते वहिवाटणे संबंधीत शेतकर्यांना फायदेशीर नसल्याने रेल्वेने शिल्लक क्षेत्रासह संपूर्ण क्षेत्राचे भूसंपादन करावे, अशी शेतकर्यांची मागणी असल्याचे निदर्शनास आणून देत याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत खा. नाईक निंबाळकर यांनी अधिकार्यांना निर्देश दिले.
फलटण-पुणे मार्गावर रेल्वे वाहतुकीस मान्यता मिळाली असल्याने लवकरच या मार्गावर प्रवासी व माल वाहतूक सुरु होणे अपेक्षीत असल्याने या मार्गावरील किरकोळ दुरुस्ती, रेल्वे गेट, बायपास वगैरे प्रश्नांबाबत तातडीने निर्णय घेऊन संपूर्ण मार्ग वाहतुक योग्य होईल यासाठी नियोजन करावे अशा स्पष्ट सूचना दिल्या. प्रामुख्याने या मार्गावरील सर्व गेट स्वयंचलीत करावीत, अंडर पासेस ठिकाणी रस्ते सुस्थितीत राहतील, रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साठल्याने वाहतूक ठप्प होणार नाही यासाठी योग्य व्यवस्था करावी. तसेच फलटण रेल्वे स्टेशनची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, दुरुस्ती असेल तर ती तातडीने करावी आणि स्टेशन इमारतीची मोडतोड, नासधूस टाळण्यासाठी तेथे सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत, अशा सूचना खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी रेल्वे अधिकार्यांना दिल्या.
आदर्की रेल्वे स्टेशन गावापासून किंबहुना लोकवस्तीपासून दूर असून तेथे कोणतेही वाहन अगदी दुचाकी ही जाऊ शकत नसल्याने या स्टेशनवर उतरुन घराकडे जाणार्या किंवा स्टेशनवर येणार्या प्रवाशांना 7/8 कि. मी. चालत जावे/यावे लागत असल्याने हे स्टेशन सोईच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असल्याचे निदर्शनास आणून देत योग्य मार्ग काढण्याच्या खा. नाईक निंबाळकर यांच्या सुचनेबाबत स्टेशन स्थलांतरीत करणे शक्य नाही, त्यापेक्षा तेथे जाण्यासाठी रस्ता करणे सोईस्कर होईल. त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकार्यांनी यावेळी दिले.
वाठार स्टेशन येथे शेतमाल रेल्वे वाहतुकीची व्यवस्था, रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणामुळे पिंपोडे येथील रेल्वे गेट बंद झाल्याने तेथे पर्यायी मार्ग काढणे साठी सूचना देऊन त्यासाठी आवश्यक निधी रेल्वे बोर्डाकडून मंजूर करुन आणण्याचे आश्वासन खा. नाईक निंबाळकर यांनी दिले. या बैठकीनंतर वरिष्ठ रेल्वे अधिकार्यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समवेत फलटण व सुरवडी रेल्वे स्टेशन, रेल्वे गेट, बायपास वगैरेंची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व सूचनांनुसार आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.