फलटण / प्रतिनिधी : फलटण-पंढरपूर मार्गावर विडणी गावच्या हद्दीत टेंपोने कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचालक ठार झाला, तर एक जण...
फलटण / प्रतिनिधी : फलटण-पंढरपूर मार्गावर विडणी गावच्या हद्दीत टेंपोने कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचालक ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सुहास मारुती गरगडे (वय 22, रा. गरगडे वस्ती गुणवरे, ता. फलटण) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
सुहास गरगडे व त्याचा चुलत भाऊ सौरभ हणमंत गरगडे हे फलटणहून कारने गुणवरे येथे निघाले होते
. सुहास हा कार चालवित होता. कार विडणीच्या हद्दीत आली असता फलटणकडे वेगाने निघालेल्या टेंपोने धडक दिली. यामध्ये सुहास गरगडे याचा मृत्यू झाला, तर त्याच्या समवेत कारमध्ये असलेला त्याचा भाऊ सौरभ गरगडे (वय 21) हा गंभीर जखमी झाला. काल सकाळी पावणेअकराच्या सुमारास हा अपघात घडला. टेंपोचालक मारुती विठ्ठल कोडग (वय 40, रा. आवंडी ता. जत, जि. सांगली) याला घटनास्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात मृत्यूस व गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या अपघाताचा तपास पोलिस हवालदार डी. डी. कदम करीत आहेत. दरम्यान, सुहास गरगडे याच्यावर गुणवरे येथे रात्री आठच्या सुमारास शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.