जरे कुटुंबाचा सवाल; पोलिसी तपासावरही संशय अहमदनगर / प्रतिनिधी: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्...
जरे कुटुंबाचा सवाल; पोलिसी तपासावरही संशय
अहमदनगर / प्रतिनिधी: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार, सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ बोठे याला वाचविण्यासाठी कोणा मंत्र्याने ताकद तर लावली नाही ना, या प्रकरणात खूप मोठे काही तर घडविण्याची तर योजना नाही ना, असे प्रश्न जरे कुटुंबीयांनी उपस्थित के
ले आहेत.
जरे कुटुंबीयांचे वकील सचिन पटेकर यांच्यामार्फत पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना हे निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणात नाव निष्पन्न झाल्यानंतर महिन्याभराहून अधिक काळ बोठे फरारी आहे. त्याचा कोणताही ठावठिकाणा पोलिसांना लागलेला नाही. त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस सांगत असले तरी, प्रत्यक्षात त्यांना यश आल्याचे दिसून येत नाही. यासंबंधी जिल्ह्यात चर्चाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जरे कुटुंबीयांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, की गुन्हा घडल्यापासून बोठे पसार झालेला आहे. त्याचा ठावठिकाणा पोलिसांना सापडलेला नाही. हे प्रकरण राज्यभरात गाजत असताना त्याला कसला तरी गो-बाय देण्याचा प्रयत्न होत असल्याचे जाणवत आहे.
बोठे याचा इतिहास पाहिला असता त्याला शासकीय वरदहस्त आहे का? त्यातून पोलिस यंत्रणेवर दबाव येतो आहे का? पोलिस यंत्रणा गोंधळली आहे का? पोलिसांतील काही अधिकारी बोठेला मदत करत आहे का? असे विविध प्रश्न या निवेदनात उपस्थित करण्यात आले आहेत. या प्रश्नांची उत्तरे आतापर्यंत मिळू शकलेली नाहीत. याचा अर्थ असा की, मास्टरमाइंड असलेल्या बोठेने स्वतःच्याच नियंत्रणात सगळी परिस्थिती ठेवल्याचे दिसते. तसेच गेल्या काही दिवसांपासून नागरिक स्वतःहून पोलिसांत जाऊन गुन्हा नोंदवत आहेत. जे त्याच्या भीतीपोटी समोर येण्यास तयार नव्हते, ते आज धाडस करून समोर येण्यास तयार झाले आहेत. पोलिसांनी फिर्यादीला संरक्षण दिलेले असले तरी, यापुढे जर बोठे सापडला नाही, तर पोलिस संरक्षणात जरे कुटुंबीय किती दिवस भीतीच्या वातावरणात जगणार, असा प्रश्नही निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. 16 डिसेंबर रोजी बोठेचा अटकपूर्व जामीन रद्द झाला आहे; परंतु अद्यापही तो उच्च न्यायालयात गेलेला नाही. याचा अर्थ त्याच्याकडून खूप मोठे काहीतरी घडवण्याचे नियोजन आहे. सदर घटनेवरून लोकांचे लक्ष विचलित करणे तसेच या केसमधील तीव्रता कमी करण्याचे नियोजन असल्याचा प्रकार सुरू असल्याचा संशय येतो, असेही निवेदनात म्हटले आहे. पोलिसांनी वेगाने तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे