अहमदनगर / प्रतिनिधीः नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर शिवारात शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघातात नीलेश मच्छिंद्र मेहेत्रे (वय 30, रा.जेऊर, ता.नगर...
अहमदनगर / प्रतिनिधीः नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर शिवारात शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघातात नीलेश मच्छिंद्र मेहेत्रे (वय 30, रा.जेऊर, ता.नगर) हा फुलविक्रेता जागीच ठार झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी, की जेऊर शिवारातील टोलनाक्यावर नीलेश व त्याचा भाऊ गोरख फुल व हार विक्रीचा व्यवसाय करत होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास नगरकडून औरंगाबादकडे जाणार्या टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो (क्र. एम.एच.-12, आर.एन. 1999) टोलनाक्यावर बांधण्यात आलेल्या संरक्षक कठड्याला धडकून उलटला.
यावेळी कठड्याजवळ हार विकण्यासाठी उभे राहिलेल्या नीलेशला जबर मार लागल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. या वेळी टोल नाक्यावरील कर्मचारी माजी सैनिक राजेंद्र बनकर व रघुनाथ पवार यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. घटनेनंतर टेम्पो चालक फरार झाला आहे. नीलेश याच्यावर दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी एमआयडीसी. पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद जाधोर, फौजदार दीपक पाठक, हवालदार रमेश थोरवे, पोलिस नाईक गणेश कावरे, पो. कॉ.संदीप आव्हाड, पो. कॉ. अनिल पवार यांनी घटनेचा पंचनामा केला. महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.