फडणवीस, राज ठाकरे, राणे, चंद्रकांतदादा, सुधीरभाऊंचा समावेश मुंबई /प्रतिनिधी: राज्यातील भाजपच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण...
फडणवीस, राज ठाकरे, राणे, चंद्रकांतदादा, सुधीरभाऊंचा समावेश
मुंबई /प्रतिनिधी: राज्यातील भाजपच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढण्यात आली असून त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढण्यात येणार आहे. तर वकील उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेचा आढावा बैठक झाली. की बैठक दर एक ते दोन महिन्यांमध्ये होते. कोविड काळात पोलिसांवर खूप ताण आलेला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचा नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षा कमी केल्यानंतर फडणवीस म्हणाले, की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा सुरक्षा घेतली. मी भाजप प्रदेश अध्यक्ष होतो, त्या वेळीही सुरक्षा घेतली नव्हती. याकूब मेननच्या फाशीनंतर आणि नक्षलवादी कारवायांनंतर केंद्राच्या सांगण्यावरून माझी सुरक्षा वाढवण्यात आली होती. या सरकारला असे वाटत असेल, की आता सुरक्षेची गरज नाही. मला सुरक्षेची गरज नाही, मी फिरत राहणार. आता राजकीय निर्णय केले जात आहेत. माझी कुठलीही तक्रार नाही, मी जनतेतला माणूस आहे, त्यामुळे माझ्या फिरण्यावर काहीही फरक पडणार नाही, असे फडणवीस म्हणाले. भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर उपहासात्मक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, की सुरक्षा काढली याबद्दल सरकारचे धन्यवाद; पण लोकांच्या सुरक्षेसाठी आमचा आवाज बंद होणार नाही. चंद्रपूर हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे आणि दारूबंदीमुळे मला ज्या धमक्या मिळत होत्या, त्यासाठी सुरक्षा दिली होती. सुरक्षा एक एक ग्रेडने कमी केली जाते; पण सरकारने एकदम शून्य केली. सरकारला मनापासून धन्यवाद की राज्य एकदम सुरक्षित आहे म्हणून ही सुरक्षा काढली! हा निर्णय पूर्णपणे राजकीय आहे आणि याची नोंद तुम्ही ठेवा, सरकार येते आणि जाते. आम्हाला स्वतःच्या सुरक्षेची चिंता नाही, तर लोकांच्या सुरक्षेसाठी आमचा आवाज अजून धारधार होईल, असे ते म्हणाले.
सुरक्षा कमी करण्याचा पवारांचा फोन
सुुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याच्या निर्णयावरून आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून आपली सुरक्षा कमी करा, असे म्हटले आहे. पवार हे देशमुख यांना पत्र लिहून मागणी करणार आहेत. गरज नसल्यास माझी सुरक्षा कमी करण्यात यावी, असा फोन आला होता, अशी माहिती देशमुख यांनी दिली.