सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरानजीकच्या कृष्णानगर येथील जया गणेश पाटील (गायकवाड) यांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरण...
सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरानजीकच्या कृष्णानगर येथील जया गणेश पाटील (गायकवाड) यांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आनंद दाजी पेडणेकर (वय 32, रा. संभाजीनगर, सातारा. मूळ रा. चंदगड, जि. कोल्हापूर) यास अटक केली. संशयिताला जया पाटील ह्या घरी राहण्यासाठी दबाव टाकत होत्या. तसे न केल्यास बदनामी करण्याची धमकी देत होत्या. या कारणातून चिडून जाऊन संशयिताने त्यांचा खून केला. ही कारवाई सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) पथकाने केली. येथील शिवतेज हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक धीरज पाटील उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती अशी, जया पाटील ह्या एकट्याच घरी राहत होत्या. टीव्हीवरील मालिकांसाठी त्या लेखनही करत होत्या. शनिवार, दि. 16 रोजी सकाळी त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे समोर आल्यानंतर परिसर अक्षरश: हादरून गेला. क्रूर पध्दतीने वार झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खुनाची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी धाव घेवून घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छदेनासाठी पाठवल्यानंतर त्यांचा गळा धारदार शस्त्राने कापल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता वृध्द महिलेचा मोबाईल चोरी झाला असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर पोलिसांना नेमका धागादोरा लागत नव्हता. एलसीबीनेही तपासाला सुरुवात केली. परिसरात राहणार्यांसह कुटुंबियांकडे चौकशीला सुरुवात झाली. याप्रकरणी अनेकांचे जाबजबाब घेत चौकशीची प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र, सहाव्या दिवसापर्यंतही पोलीस अंतिम निष्कर्षापर्यंत पोलिस पोहचलेले नव्हते. अखेर पोलिसांनी तांत्रिक तपासावर फोकस केल्यानंतर त्यांच्या हाती धागेदोरे मिळाले. त्यावरुन पोलिसांनी संशयित आनंद पेडणेकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली.
गेल्या काही महिन्यांपूर्वी जया पाटील व त्याची प्रवासात ओळख झाली. ओळखीतून त्यांनी एकमेकांना फोन नंबर दिले. त्यातून त्यांच्या भेटीगाठी झाल्या व पुढे अनैतिक संबंध झाले. घटनेनंतर जया पाटील यांनी आनंद पेडणेकर याला त्यांच्याकडे घरी राहण्याचा तगादा लावला. यामुळे आनंद वैतागला होता. त्याने नकार दिल्यानंतर जया पाटील यांनी त्याला बदनामी करण्याची धमकी दिली. या प्रकाराला कंटाळल्याने आनंद पेडणेकर याने जया पाटील यांचा खून केला.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक आँचल दलाल, पोनि अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चेतन मछले, फौजदार नानासाहेब कदम, पोलिस हवालदार प्रशांत शेवाळे, अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, संदीप आवळे, गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग, विशाल धुमाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.