कोणाचा फोन आला, तर मला सांगा ;पोलिसांना सूचना पुणे/प्रतिनिधी : पोलिसांचा वचक हा सामान्य नागरिकांवर नव्हे, तर गुन्हेगारांवर असायला हवा. सामा...
कोणाचा फोन आला, तर मला सांगा ;पोलिसांना सूचना
पुणे/प्रतिनिधी : पोलिसांचा वचक हा सामान्य नागरिकांवर नव्हे, तर गुन्हेगारांवर असायला हवा. सामान्य नागरिकांना पोलिसांकडे मदत मागायला येताना भीती वाटता कामा नये, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. गुन्हेगारांना पाठीशी घालू नका. माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला, तर मला सांगा, मी त्यांना बघून घेतो, अशा सूचनाही पवार यांनी पोलिसांना दिल्या.
पिंपरी चिंचवड पोलिसांना सायकली आणि स्मार्ट वॉचचे वाटप पवार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच गृहरक्षक दलाचा प्रारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. मोठी पोलिस भरती करण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात अपुरी सुविधा असताना येथे पोलिस कार्य करत आहेत. तुम्हाला सर्व काही द्यायचे आहे; पण कोरोनामुळे खर्च झाला. लवकरच सुविधा पुरवू, अशी ग्वाही पवार यांनी दिली. तुमच्या हातातील स्मार्ट वॉच तुम्हाला ट्रेस करणार आहे. त्यामुळे कोणता पोलिस कुठे काम करतो आहे, हे ही पोलिस आयुक्तांना समजणार आहे. आरोग्यासोबत तुम्ही काम व्यवस्थित करता का, हे ही जाणून घेण्याचा यामागे खरा गेम आहे; मात्र हे पोलिस आयुक्तांनी तुम्हाला सांगितले नाही, असा टोमणा त्यांनी मारला. मी कोरोना काळात पोलिसांनी दिलेल्या सेवेला सलाम करतो. वाहनांचे जळीतकांड, वाहनांची तोडफोड, व्यापार्यांना गुंडांकडून होणार त्रास यासह विविध गुन्हे कायमचे बंद करा. कोणाची हयगय करू नका. एकाला ही पाठीशी घालू नका. माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला, तर मला सांगा, मी त्यांना बघून घेतो, अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना आश्वस्त केले. गुंडांचा बंदोबस्त करा, त्यांचा नायनाट करा, कायद्याच्या चौकटीत राहून करा, असे सांगताना ही पोलिसांना तेवढ्याच सुविधा देणे गरजेचे आहे. मी ते करतो आहे, लवकर महाराष्ट्रातील बेस्ट आयुक्तालय करू; परंतु त्या इमारतीतून तसेच बेस्ट काम व्हायला हवे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. शहरातील सुविधांबाबत बोलताना पवार म्हणाले, की शहरात फिरणार्या प्रत्येक महिलेला आणि सामान्य व्यक्तीला निर्धास्त वाटायला हवे. चोर आले म्हणून पुण्यात दोन पोलिस पळाले, हे किती केविलवाणे आहे. ही घटना सीसीटीव्हीमुळे समाजासमोर आली. पोलिस आले म्हणून चोर पळाले पाहिजेत, पण इथे उलट झाल्याचे सर्वांनी पाहिले, म्हणून त्या पोलिसांवर कारवाई झाली; पण या घटनेने समाजात पोलिसांची प्रतिमा मलीन झाली. असे पुढे होता कामा नये.