पुणे/प्रतिनिधी : वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मेट्रो मार्गावर निर्माण होणार्या सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिय...
पुणे/प्रतिनिधी : वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मेट्रो मार्गावर निर्माण होणार्या सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी या दोन्ही महामार्गावरील सर्व स्टेशनवर बायोडायजेस्टर सिस्टिम बसविण्यात येणार आहे. पुणे मेट्रोमध्ये बायोडायजेस्टर तंत्रज्ञान वापरासंबंधी पुणे मेट्रो आणि संरक्षण, संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) यांच्यामध्ये मंगळवारी सयुक्तिक करार झाला. या संबंधीच्या करारावर डीआरडीओचे संचालक डॉ. एच. के. सिंग आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या स्वाक्षर्या झाल्या. या वेळी प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ आणि डॉ. डी. के. दुबे उपस्थित होते. त्यानंतर दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
दीक्षित म्हणाले, की पुणे मेट्रोचे काम प्रगतिपथावर असून आतापर्यंत 47 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोमध्ये वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांवर 31 स्थानके असणार आहेत. पुणे मेट्रोच्या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी लिफ्ट, एस्केलेटर, पिण्याचे पाणी, इन्फॉर्मेशन डिस्प्ले व प्रसाधन सुविधा उपलब्ध असणार आहेत. पुणे मेट्रोची स्थानके ग्रीन बिल्डिंगच्या मार्गदर्शक तत्वाद्वारे बनविण्यात येत असल्यामुळे अनेक पर्यावरण संवर्धन तंत्रज्ञानाचा स्टेशन उभारणीत समावेश करण्यात आला आहे. तसेच स्थानकांमध्ये निर्माण होणार्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोडायजेस्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. डीआरडीओ संस्थेने हे बायोडायजेस्टर तंत्रज्ञान विकसित केले आहे. मोठ्या प्रमाणात त्याचा वापर सैन्यदल व रेल्वेमध्ये वापर होतो. बायोडायजेस्टर तंत्रज्ञान वापरण्यास अत्यंत सुलभ असून त्याला कमीत कमी देखभालीची गरज पडते. हे प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा स्टेशनमध्ये फ्लश, झाडे आणि स्टेशनची स्वच्छता करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
बायोडायजेस्टर तंत्रज्ञानासंबंधी करारामुळे पुणे मेट्रोला आपली पर्यावरणपूरक बांधिलकी जपण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. झाडांचे पुनर्रोपण, सोलर विद्युत पॅनेलचा वापर, मेट्रो स्थानकांमध्ये कमीत कमी विजेचा वापर, बायोडायजेस्टर इत्यादी पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर मेट्रो उभारणीत करण्यात येत आहे. या करारामुळे पुणे मेट्रोच्या पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनेला बळ मिळणार आहे. पुणे मेट्रो एक आदर्श पर्यावरण पूरक मेट्रोमध्ये भविष्यात नावारूपाला येईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.