उद्या जिल्हा परिषदेत बैठकीत होणार ठोस निर्णय दादासाहेब काशिद / मसूर : प्रतिनिधी : कोरोना महामारी कालावधीत शाळा बंद कालावधीत संपूर्ण फी भर...
उद्या जिल्हा परिषदेत बैठकीत होणार ठोस निर्णय
दादासाहेब काशिद / मसूर : प्रतिनिधी : कोरोना महामारी कालावधीत शाळा बंद कालावधीत संपूर्ण फी भरण्याचा तगादा लावला प्रकरणी कोपर्डे हवेली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रशासनाविरोधात सर्व पालकांनी संतप्त भावना व्यक्त करत सदर फी बद्दल येत्या 10 दिवसात योग्य निर्णय न घेतल्यास तहसीलदार यांच्यासमोर प्रांतिक उपोषणास बसणार असल्याचा इशारा देत पालकांनी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांची भेट घेऊन सह्याद्वारे निवेदन दिले आहे. न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. याबाबत सोमवार, दि. 25 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाधिकारी शालेय प्रशासन व पालक यांच्यामध्ये विशेष बैठक होणार आहे.
याबाबत पालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात सर्व शाळा बंद ठेवून प्रशासनाने कोणतीही फी वाढ करू नये असा शासन निर्णय असतानाही कोपर्डे, ता. कराड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल या प्रशासनाने पालकांना विद्यार्थ्यांची संपूर्ण फी भरण्याचा तगादा लावला आहे. ते चुकीचा व अन्यायकारक आहे. चालू वर्षाची सर्वांचीच आर्थिक बिकट परिस्थिती पाहता शालेय प्रशासनाने सदर फी मध्ये 50 टक्के माफी देण्याची गरज आहे. सध्या शाळेचे कामकाज बंद असून शैक्षणिक मासिक खर्च होत नाही मुलांना ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी सर्व विषयांचे क्लासेस व अभ्यासक्रम पूर्ण होत नाहीत. यामुळे मुलांना शिकण्यात अडथळा येत आहे सध्या पहिल्या टर्म चा 30 टक्के वार्षिक अभ्यासक्रम देखील पूर्ण झाला नाही. अर्ध्यापेक्षा जास्त शैक्षणिक वर्ष संपले आहे. शाळा कधी चालू होणार हे पालकांना माहीत नाही. मुलांचे सर्व शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही. अशी खात्री पालकांना वाटत आहे मार्चपासून शाळा एकही दिवस शाळा भरली नाही. वास्तविक शाळेमध्ये सामान्य शेतकरी कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहेत. पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी आपले पशुधन विकून व काहींनी कर्ज काढून मुलांच्या फी बरोबरच शैक्षणिक सुविधासाठी साहित्य खरेदी केले आहे. कोरोणाच्या बिकट परिस्थितीत पालकांना संपूर्ण फी भरणे अशक्य होऊन बसले आहे. तरीही पालक 50 टक्के शालेय फी भरण्यास तयार आहेत. याबाबत सर्व पालकांनी शालेय प्रशासनास 6 सप्टेंबर, 15 डिसेंबर 2020 प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते. तसेच दि. 22 जानेवारी रोजी आंदोलन ही पुकारले होते. परंतू याबाबत प्रशासनाने कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही व फी माफी बद्दल कसलाही विचार करता येणार नसल्याची ठोस भूमिका घेतल्यामुळे सर्व पालक हवालदिल झाले आहेत. याबाबत पालकांनी अनेकांना निवेदन देऊन सदनशीर मार्गाचा अवलंब केला आहे. तसेच येत्या दहा दिवसात फी माफी बद्दल योग्य निर्णय न घेतल्यास सर्व पालकांच्या वतीने नाईलाजास्तव तहसिलदार कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा पालकांनी या निवेदनात दिला आहे.
आजच्या महत्त्वपूर्ण विशेष बैठकीकडे सर्व पालकांचे लक्ष
पोदार इंटरनॅशनल शालेय प्रशासनाने कोरोणा कालावधीतही 100% फी घेण्यावर ठाम आहेत तर पालक 50% फी देण्यावर ठाम आहेत. याबाबत शिक्षणाधिकारी शालेय प्रशासन व पालक यांच्यात उद्या सोमवार, दि. 25 जानेवारी रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यामध्ये सर्वांच्या बाजू ऐकून घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी पालकांना सांगितले. दरम्यान, बैठकीत अन्यायकारक व चुकीच्या फी बाबत सकारात्मक तोडगा निघणार का? याकडे सर्व पालकांचे लक्ष लागले आहे.