अहमदनगर : रेखा जर हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याला पाठीशी कोण मंत्री घालत आहे ? अशी चर्चा आता नगरमध्ये सुरु झाली आहे. रेखा ...
अहमदनगर : रेखा जर हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याला पाठीशी कोण मंत्री घालत आहे ? अशी चर्चा आता नगरमध्ये सुरु झाली आहे. रेखा जरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे वाचविण्यासाठी कोणा मंत्र्याने ताकद तर लावली नाही ना, त्याला गो-बाय कोणी देत आहे का? या प्रकरणात खूप मोठे काही तर घडविण्याची तर योजना नाही ना? असे प्रश्न जरे कुटुंबियांतर्फे उपस्थित करण्यात आले आहेत. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना वकील अॅड. सचिन पटेकर यांच्यामार्फत प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन दिले आहे.
या पत्रात म्हटले आहे, की यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात संशयित मुख्य सुत्रधार बोठे याचा अटकपूर्व जामीन अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. गुन्हा घडल्यापासून बोठे हा त्याच्या चतूर व सुड बुद्धीचा वापर करून फरार आहे. बोठेला अद्यापपर्यत अटक करण्यात आलेली नसून पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे चौकशी रेंगाळल्यने संशयाला वाव आहे. जरे हत्या प्रकरण महाराष्ट्रात गाजत असून त्याला कसा तरी ‘बाय’ देण्याचा प्रयत्न होत असल्याचे जाणवत आहे. संशयित मुख्य आरोपी बोठे याचा पूर्वीचा इतिहास पाहिल्यास तो थक्क करणारा आहे. बोठेच्या इतिहासाचे दाखले आता गुन्ह्याच्या स्वरूपात लोकांसमोर येत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या बोठेचा ब्लॉकमेल करणे हा एकमेव व्यवसाय आहे. एका वर्तमानपत्राच्या कार्यकारी संपादकापासून पुणे विद्यापिठापर्यत पद भूषविणार्या बोठे याला शासकिय वरदहस्त आहे का, यातून पोलिस यंत्रणेवर दबाव येतोय का, पोलिस यंत्रणा गोंधळलेली आहे का, पोलिसांतलेच काही अधिकारी बोठेला लपवत आहेत का, असे अनेक प्रश्न चर्चिले गेलेत. तसेच अन्य कोणी मदत करत आहे का, अशीही विचारणा होत आहे. यापैकी कुठल्याच प्रश्नाला दुर्देवाने अद्याप उत्तर मिळू शकलेले नाही.