पुणे /प्रतिनिधी: सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरच हा घातपात होता की अपघात होता हे कळेल. त्याआधी काहीही भाष्य ...
पुणे /प्रतिनिधी: सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरच हा घातपात होता की अपघात होता हे कळेल. त्याआधी काहीही भाष्य करणे घाईचे ठरेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ठाकरे यांनी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये येऊन आगीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार गिरीश बापट, शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोर्हे, आदर पुनावाला, सायरस पुनावाला आणि आमदार चेतन तुपे होते.
आग कशामुळे लागली, किती नुकसान झाले, बीसीजी लस सुरक्षित आहे का, आदींची माहिती घेतानाच आगीतील मृत कामगारांविषयीची माहितीही मुख्यमंत्र्यांनी घेतली. ते म्हणाले, की कोरोनाच्या संकट काळात सीरम इन्स्टिट्यूट आशेचा किरण होती. त्यामुळे सीरमला आग लागल्याचे कळताच काळजाचा ठोका चुकला; मात्र सुदैवाने जिथे लस तयार केली जाते, तिथे हा प्रकार घडला नाही. कोरोना लसीचा साठा पूर्णपणे सुरक्षित आहे. सीरमच्या या नव्या इमारतीतील दोन मजले वापरात होते. तिथे नवीन केंद्र सुरू करण्यात येणार होते. तिथेच ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील मृत कुटुंबीयांची जबाबदारी सीरमने घेतली आहे. आवश्यकता पडल्यास सरकारही मदतीचा हात देईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या दुर्घटनेत लसीचे नुकसान झालेले नाही. कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित आहे. रोटाव्हायरस आणि बीसीजीच्या लसीचे नुकसान झाले आहे. आगीत महत्त्वाच्या साहित्याचे नुकसान झाले आहे;परंतु पुरवठ्यात नुकसान नाही; मात्र हजारो कोटींचे नुकसान झाले आहे, अशी माहिती आदर पुनावाला यांनी दिली. भविष्यात आम्ही या इमारतीत कोरोनाची लस आणून ठेवणार होतो. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.