नवीदिल्लीः भारतात कोरोना प्रतिबंधक दोन लसींना मर्यादीत आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. यात सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच...
नवीदिल्लीः भारतात कोरोना प्रतिबंधक दोन लसींना मर्यादीत आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. यात सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा समावेश आहे. भारतात सर्व भागांमध्ये लस पोहोचवण्यासाठी भारतीय वायुदलाच्या ताफ्यातील विमानांचा वापर करण्यात येणार आहे. यात सी-1301 जे आणि एन-32सारखी मोठी विमाने लसी पोहोचवण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. लस उत्पादकांनी विशेष कंटेनर्सची व्यवस्था केली आहे. वाहतुकीदरम्यान लसी अपेक्षित तापमानात स्टोअर करण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेश, लडाखसारख्या दुर्गम भागांमध्ये लसी पोहोचवण्यासाठी वायुदलाच्या ताफ्यातील मालवाहतूक विमानांचा वापर करण्यात येणार आहे. हवाईमार्गे लस पोहोचवण्यासाठी मोठया प्रमाणात व्यावसायिक विमानांचा वापर केला जाईल. वायुदल या व्यावसायिक विमानांना लष्करी धावपट्ट्यांचा वापर करण्याची परवानगी देईल. सहसा व्यावसायिक विमाने लष्करी धावपट्ट्यांचा वापर करत नाही. देशातील दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्यासाठी वायुदलाच्या विमानांचा वापर केला जाईल. योजनेनुसार, गरज पडली तर लस पोहोचवण्यासाठी वायुदल आपल्या हेलिकॉप्टर्सचासुद्धा वापर करेल.