बोंद्री गावच्या शिरपेचात मानाचा तुरा पाटण / प्रतिनिधी : बोंद्री, ता. पाटण गावची सुकन्या रोहिणी राजेंद्र पवार हिची सेंट्रल पोलीस पदी निवड झा...
बोंद्री गावच्या शिरपेचात मानाचा तुरा
पाटण / प्रतिनिधी : बोंद्री, ता. पाटण गावची सुकन्या रोहिणी राजेंद्र पवार हिची सेंट्रल पोलीस पदी निवड झाली असून जिद्द, चिकाटीच्या बळावर रोहिणी हिने खडतर परस्थीतीत यश मिळवले. गावच्या सुकन्येने मिळविलेल्या या यशामुळे बोंद्री गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
पाटण तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या बोंद्री गावात एका सर्वसामान्य कुटूंबात जन्म झालेल्या रोहिणीने स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 2018 साली पोलिस भरतीसाठी परिक्षा दिली होती. त्यामध्ये ती उतीर्ण झाली असून तीची सेंट्रल पोलिस पदी निवड झाली आहे. कु. रोहीणी हिचे प्राथमिक शिक्षण बोंद्री गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण पाटण येथील कै. सुलोचनाबाई पाटणकर कन्याशाळेत झाले. उच्च शिक्षण तीने बाळासाहेब देसाई कॉलेज येथे घेतले. तसेच भरतीपुर्व प्रशिक्षण किंगमेकर अॅकॅडमी सुरूल (पाटण) येथे पुर्ण झाले.
लहानपणापासून जिद्दी, कष्टाळू स्वभाव असलेल्या रोहिनीने शालेय जीवनापासून उच्च अधिकारी व्हायचे असा निश्चयच केला होता. त्यास आई-वडील व नातेवाईक यांनी साथ दिली. वडील राजेंद्र हरी पवार यांचा पाटण शहरात छोटेखानी लाँड्रीचे दुकान आहे. या दुकानावर आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत दोन्ही मुलांना शिक्षण देत आहेत. तर आई सौ. राजश्री पवार या अंगणवाडी सेविका आहेत. लहान भाऊ रोहित शिक्षण घेत आहे. पै-पै जमा करून राजेंद्र पवार, राजश्री पवार या उभयतांनी मुलीचे शिक्षणाचा खर्च केला आहे.
उच्च अधिकारी व्हायचे असे स्वप्न बाळगत, रोहिणी हिने अपार मेहनत, चिकाटीने आभ्यास करत यश संपादन करून सेंट्रल पोलिस म्हणून शासकीय सेवेत जाऊन देशसेवा करण्याचा मान तीने मिळवत आपल्या आई-वडीलांचे स्वप्न साकार केले आहे. तीच्या या यशाबद्दल बोंद्री ग्रामस्थांसह विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.