कराड / प्रतिनिधी : कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या संविधान प्रचारक कार्यशाळेत सहभागी झालेल्या सामाजिक संस्था, संघटना आणि युवा प...
कराड / प्रतिनिधी : कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या संविधान प्रचारक कार्यशाळेत सहभागी झालेल्या सामाजिक संस्था, संघटना आणि युवा प्रतिनिधींनी संविधान प्रचारक लोकचळवळीतून साक्षर नागरिक घडविण्याचा निर्धार केला. संविधानिक मूल्यांचा प्रचार-प्रसार अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचूया, असा संदेश या कार्यशाळेद्वारे देण्यात आला.
संविधान प्रचारक सातारा जिल्हा संयोजन गट व ज्ञानदिप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेतर्फे आयोजित संविधान प्रचारक कार्यशाळेत सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक संस्था, संघटना आणि युवा प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेत संविधान प्रचारक नागेश जाधव, संदिप आखाडे, वैशाली रायते, करिश्मा जाधव आणि ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत विविध विषयांवर गट चर्चा करण्यात आली. यामध्ये संविधान निर्मितीचा इतिहास, संविधानाची प्रास्ताविका, न्याय-स्वातंत्र्य-समता-बंधुता याविषयावर मांडणी करण्यात आली. खेळातून संविधान निर्मितीचा इतिहास व संविधानाची गरज याविषयी प्रबोधन करण्यात आले. त्याचबरोबर संविधानाप्रमाणे भारत कसा घडवावा, याबद्दल सखोल चर्चा झाली. भारत आणि भारतीय नागरिक घडण्याच्या लोकचळवळीत सर्वांनी सहभागी होवू या, असे आवाहन आनंदा थोरात यांनी केले. संस्थेचे संचालक मधुराणी थोरात व सुनीता डाईंगडे यांनी स्वागत केले. अर्चना पाटील यांनी सुत्रसंचालन केले. बाजीराव पाटील यांनी आभार मानले.