संगमनेर/प्रतिनिधी : संगमनेर बसस्थानकाच्या वाहनतळ परिसरात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे फलक लावले होते. कॉंग्रेस प्...
संगमनेर/प्रतिनिधी : संगमनेर बसस्थानकाच्या वाहनतळ परिसरात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे फलक लावले होते. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी हे फलक तेथे थांबून काढायला लावले. शहराचे विद्रुपीकरण करणारे लावलले फलक काढण्याचे तसेच विनापरवाना कुठेही फलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश महसूलमंत्री ना.थोरात यांनी प्रशासनाला दिले.
महसूलमंत्री ना.थोरात हे शुक्रवारी त्यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात आले होते. नव्याने झालेल्या संगमनेर बसस्थानकासमोरून ते जात असताना त्यांनी चालकाला चारचाकी वाहन थांबविण्यास सांगितले. मंत्री थोरात प्रवास करीत असलेले वाहन अचानक थांबल्याने त्यांच्या ताफ्यातील सर्वच चारचाकी वाहने थांबली. मंत्री महोदय वाहनातून खाली उतरल्याने
संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांनाही नेमके काय झाले ? ते कळेना त्यामुळे पोलिसही त्यांच्या पाठीमागे निघाले.संगमनेर बसस्थानकाच्या वाहनतळात लावलेल्या फलकांकडे मंत्री थोरात गेल्यानंतर तेथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. महसुलमंत्री ना.थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या छबीसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारा संदेश असलेले हे फलक होते. हे फलक बसस्थानकाच्या वाहनतळात कुणी लावले? ही फलक लावण्याची जाागा नाही. हे फलक तात्काळ काढा. असा आदेशच थोरातांनी दिल्याने कार्यकर्त्यांसह प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. हे फलक काढण्याल्यानंतर महसुलमंत्री ना.थोरात तेथून पुढे पत्रकार परिषदेसाठी रवाना झाले.