कराड / प्रतिनिधी : पुणे बंगळूर आशियाई महामार्गाच्या कराड येथील कोल्हापूर नाक्यावर वाहनांचे वाढते ट्राफिक, शहरात येणारी-बाहेर पडणारी वाहने एक...
कराड / प्रतिनिधी : पुणे बंगळूर आशियाई महामार्गाच्या कराड येथील कोल्हापूर नाक्यावर वाहनांचे वाढते ट्राफिक, शहरात येणारी-बाहेर पडणारी वाहने एकाच मार्गाने ये-जा करत असल्याने या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा या ठिकाणी नागरिकांना जीव देखील गमवावा लागला आहे. कोल्हापूर नाका येथे नवीन उड्डाण पूल व्हावा यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आज पृथ्वीराज बाबांनी कोल्हापूर नाका येथे अपघात ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. परिस्थितीची पाहणी केली. यावेळी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, डीवायएसपी डॉ. रणजित पाटील, राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी वसंत पंधरकर, शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, वाहतूक शाखेच्या पाटील तसेच मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजीत चव्हाण, राहुल चव्हाण यावेळी उपस्थित होते.
या भेटीनंतर माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी या सर्व अधिकार्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांनी कोल्हापूर नाका येथे उभारण्यात येणार्या उड्डाण पुलाचा आराखडा आ. चव्हाण यांच्यासमोर सादर केला. हा उड्डाण पूल 3.5 किलोमीटर लांबीचा असणार आहे. हा सातारा-कागल या राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात अधिक लांबीचा पूल असणार आहे. या पुलाची माहिती देताना वसंत पंधरकर म्हणाले कि, हा पूल सिंगल पिलर रचनेवर उभारला जाणार आहे तर हा पूल वाहतुकीसाठी सहा पदरी असणार आहे. तसेच या उड्डाण पुलाखालील सर्व्हिस रोड हा चौपदरी असणार आहे. हा पूल हॉटेल पंकज येथून ते एनपी मोटर्स इथपर्यंत असणार आहे. या 3.5 किलोमीटर लांबीच्या पुलामुळे कराड व मलकापूर शहराचे ट्राफिक नियंत्रण करता येणार आहे. तसेच या दोन शहराच्या वाहतुकीमुळे महामार्गावरील होणारे अपघात टाळता येऊ शकतील.
या बैठकीवेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, कोल्हापूर नाका येथील वाढते अपघात व वाहतूक कोंडी यावर नवीन उड्डाण पूल होईपर्यंत तात्काळ पर्यायी वाहतूक व्यवस्था होणेसाठी सूचना व आराखडा तयार करावा. या सर्व विभागांची पुढील 10 दिवसात पुन्हा एकदा बैठक घेऊन पर्यायी व्यवस्थेचा निर्णय घेतला जाईल. तसेच नवीन उड्डाण पुलाबाबत केंद्रीय मंत्री व सचिवांसोबत बैठक घेऊन पाठपुरावा करणार आहे. तसेच कराड शहराच्या व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा असणारा नवीन पूल लवकरात लवकर व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे.